अंबरनाथ, ता. २७ (वार्ताहर) : भारतीय प्रजासत्ताक दिन आणि स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या महामातांच्या जयंतीचे औचित्य साधून अंबरनाथ येथे संविधान व महामानवांच्या विचारांवर आधारित प्रेरणादायी कार्यक्रम घेण्यात आला होता. अंबरनाथ पूर्वेतील बी कॅबिन परिसरातील मैत्रेय बुद्ध विहारामध्ये ‘मैत्रेय बुद्ध महिला मंडळा’च्या वतीने हा सोहळा सोमवारी उत्साहात पार पडला. या वेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ; तसेच प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
सुमन राजगुरु यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात शीलघोष बौद्धाचार्य यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पार्पण करून झाली. यानंतर उपस्थितांनी बुद्ध वंदना तसेच त्रिशरण पंचशील ग्रहण करून शांतता, समता व मानवतेचा संदेश दिला.
या वेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. या उपक्रमामुळे विहार परिसरात देशप्रेम, लोकशाही मूल्ये आणि संविधानिक जाणीव यांचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता शिडूनकर यांनी केले. जय भीम व नमो बुद्धायच्या जयघोषाने विहार परिसर दुमदुमून गेला.
उपक्रमात पुष्पा कांबळे, शीलघोष ढगे, वर्षा राजगुरु, स्मिता राजगुरु, कमल मगर, शारदा कांबळे, योगिता मगर, सुनंदा कांबळे, माधव गायकवाड, बाळकृष्ण कदम, कांबळे सर, विश्राम मगर, रोहन राजगुरु, करूणा गजभिये आदी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संघर्षाचा आढावा
प्रमुख वक्त्या माजी आयुक्त अनामिका इंगोले यांनी राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या उत्थानासाठी केलेल्या संघर्षाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी पुणे करार, सायमन कमिशन आणि गोलमेज परिषद यांसारख्या ऐतिहासिक घडामोडींचा संदर्भ देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचे सखोल विश्लेषण केले. संविधानामुळेच आज महिलांना समानता, स्वातंत्र्य आणि सन्मानाचे स्थान प्राप्त झाले असल्याचे त्यांनी प्रभावीपणे मांडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.