परिवहन सेवेची उदासीनता
खालापूर, खोपोली मार्गावर मोडकळीस आलेल्या बस प्रवाशांच्या सेवेत
खालापूर, ता. २८ (बातमीदार) : खोपोली व खालापूरमधील प्रवाशांसाठी नवी मुंबई महानगर परिवहन (एनएमएमटी) सेवा पुरवते. दरम्यान, खोपोली व खालापूर या मार्गावर एनएमएमटीकडून जुन्या व मोडकळीस आलेल्या बस पुरवण्यात येत असल्याने परिवहन सेवेची उदासीनता अधोरेखित होत असल्याचे मत प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.
नवी मुंबई व रायगडमधील परिवहानाचा दुवा म्हणून नवी मुंबई महानगर परिवहन सेवेकडे पाहिले जाते. या मार्गावर एसटी महामंडळाच्या मर्यादित फेऱ्या असल्याने एनएमएमटीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. नोकरदार, विद्यार्थी, कामगार, व्यापारी अशा सर्वांसाठी ही सेवा फायद्याची ठरते. त्यांच्या संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक या सेवेवर अवलंबून आहे. पहाटे साडेपाचपासून रात्री दहापर्यंत नवी मुंबई ते खोपोली धावणाऱ्या सर्वच बस प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या असतात. असे असतानादेखील या मार्गावर जुन्या व मोडकळीस आलेल्या बस पुरवल्या जात असल्याचा आरोप होत आहे. यातील अनेक बस प्रवासादरम्यान बंद झाल्याच्या अनेक घटना मागील अनेक महिन्यांमध्येदेखील घडल्या आहेत. तरीही या मार्गावर नव्या गाड्या सोडल्या जात नाहीत, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. विशेषतः पनवेलवरून रेल्वेच्या वेळापत्रकानुसार प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. काही भागांत वातानुकूलित बससेवा पुरवणाऱ्या नवी मुंबई महापालिकेने खालापूर, खोपोली प्रवाशांसाठी सुस्थितीत असलेल्या बस पुरवाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
------------------
बस बंद पडल्यानंतर पाठीमागून येणारी दुसरी बस आधीच प्रवाशांनी भरलेली असते. त्यामुळे पनवेलपर्यंत दाटीवाटीत प्रवास करावा लागतो. यामध्ये अनेकदा पनवेल रेल्वे स्थानकाकडे पोहोचायला वेळ लागतो व कामावर पोहोचायला उशीर लागतो.
- पूजा चौधरी, प्रवासी, खालापूर
----------------
या मार्गावर चांगल्या बस पाठवणे आवश्यक आहे. ज्या प्रमाणात प्रवाशांकडून उत्पन्न मिळते, त्याच्या तुलनेत अतिशय निकृष्ट दर्जाची सेवा पुरवली जात आहे. (किर्ती पाटील, प्रवासी, खालापूर)
--------------------
खोपोली मार्गावर बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून, लवकरच दीडशे नवीन बस नवी मुंबई परिवहन विभागात दाखल होणार आहेत. प्रवाशांचे होणारे हाल याची कल्पना असून, या मार्गावर सुपर मोबिलिटी कंत्राटदारतर्फे या बस चालवल्या जात असून, प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी त्यांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती तुर्भे आगारातून मिळाली आहे.
विजय पिसाळ, आगारप्रमुख
**फोटो-खालापूर हद्दीत बंद पडलेली बस.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.