उत्तर भारतीय समाजासोबत सदैव उभे राहू
आमदार राजन नाईक यांचे वसईत प्रतिपादन
वसई ता. २७ (बातमीदार) : वसई तालुक्यात उत्तर भारतीय समाज गुण्यागोविंदाने वास्तव्यास आहेत. तसेच त्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी विकासात्मक दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे नालासोपाराचे आमदार राजन नाईक यांनी सांगितले. आपण स्वतः उत्तर भारतीय समाजाच्या कुटुंबाचा भाग असून, समाजासोबत सदैव उभे राहून सर्वोपरी मदत केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
नालासोपारा पूर्व येथील सेंट्रल पार्क चौकात उत्तर भारतीय विकास मंच व हिंदी भाषा विकास संस्था यांच्या वतीने उत्तर प्रदेश स्थापना दिन व सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी स्थानिक आमदार राजन नाईक यांनी उपस्थितांना संबोधित करताना उत्तर भारतीय समाजाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान महाराष्ट्राचे माजी मंत्री चंद्रकांत त्रिपाठी यांनी भूषवले, तर आयोजनाचे नेतृत्व संस्थेचे अध्यक्षत नागेंद्र तिवारी यांनी केले. उत्तर भारतीय समाजाची एकजूट हिच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. शिक्षण, रोजगार, व्यवसाय, महापालिकेतील सहभाग, भाषा व संस्कृतीचे संरक्षण तसेच युवकांचे संघटन महत्वाचे आहे. समाजाच्या हितासाठी सातत्याने संघर्ष करण्याची गरज असल्याचे मत अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत त्रिपाठी यांनी व्यक्त केले. या वेळी उत्तर प्रदेशचे पूर्व आमदार मणिशंकर पांडे, राघवेंद्रनाथ द्विवेदी, डॉ. अमर मिश्रा, प्रभाकर शुक्ला, नगरसेवक नीलेश चौधरी, पंकज देशमुख, जयप्रकाश सिंह, योगेश सिंह, नगरसेवक बंटी सुनील तिवारी, अंजू तिवारी, एकता सिंह यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी शिवशंकर शुक्ल यांच्यासह व्यावसायिक विजयभान सिंह, उद्योगपती राधेश्याम सिंह, डॉ. मिथिलेश मिश्र, पत्रकार सचिन दीक्षित आणि व्यवसायिक आनंद जयसवाल यांना उत्तरभारतीय रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक सुरेश शुक्ल व गायिका ममता सिंह यांनी लोकसंगीत व भक्तीगीतांचे सादरीकरण केले.