स्पष्टवक्तेपणा, प्रशासनावर मजबूत पकड, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि ते सोडवण्याची क्षमता असलेल्या अजितदादा पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत अजित पवार यांनी अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आणि प्रत्येक पदाला त्यांनी पूर्ण न्याय दिला. बारामतीसह पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे करून त्यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलून दाखवला. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
- हर्षवर्धन सपकाळ, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
...
अजितदादा पवार यांच्या निधनाची वार्ता संपूर्ण देशाला धक्का देणारी आहे. दादांचा स्वभाव दिलदार, परखड आणि सच्चा होता. त्यांच्या शब्दाशब्दात सच्चेपणा होता. जी कामे हाेऊ शकतात ती कामे त्यांनी तातडीने केली; मात्र जे काम होत नाही ते काम करण्याचे खोटे आश्वासन त्यांनी कधीच कुणाला दिले नाही. महाराष्ट्राच्या आर्थिक धोरणाबाबत त्यांचा चांगला अभ्यास होता. ग्रामीण भागाचासुद्धा त्यांना चांगला अनुभव होता. अशा लाडक्या नेत्याचे अपघाती निधन होणे हे महाराष्ट्राचे काळीज चिरणारे दुःख आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देशभरातील आंबेडकरी जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री
....
अजितदादांसारख्या धडाडीच्या नेत्याचे असे अचानक जाणे हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी धक्कादायक आहे. ‘कडक शिस्तीचे प्रशासक’ अशी ओळख असलेल्या अजितदादांनी महाराष्ट्राचे अर्थमंत्री आणि विविध खात्यांचे मंत्री म्हणून राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचा अर्थसंकल्प तब्बल ११ वेळा मांडला असून, ते महाराष्ट्राचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री ठरले. तळागाळातील शेवटच्या माणसाचा विचार करणारा हा लोकनेता होता. दादा, हा महाराष्ट्र तुम्हाला कधीच विसरणार नाही.
- छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री
...........
मी मुख्यमंत्री असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे आणि माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!
- उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष
..............
अजित पवार हे पवार साहेबांच्या मुशीत जरी तयार झालेले नेते असले, तरी त्यांनी नंतर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आणि ही ओळख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठसवली. प्रशासनावर अचूक पकड आणि एखाद्या फायलीचा गुंता सोडवताना त्याची गाठ नक्की कुठून सोडवायची याचे अचूक ज्ञान असलेला हा नेता होता. प्रशासन हे सत्ताधाऱ्यांपेक्षा वरचढ होण्याच्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणे हे अतिशय दुर्दैवी आहे. राजकारणात सडेतोडपणाची आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते. त्याचा अनुभव मलापण आहे आणि त्यामुळे ती अजित पवारांनाही किती मोजायला लागली असेल याचा अंदाज करता येतो. अजित पवारांचे मला आवडणारे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते अजिबात जातीय नव्हते आणि त्यांच्या राजकरणात जातीपातीला अजिबात स्थान नव्हते. सध्याच्या राजकारणात जातपात न मानता राजकारण करण्याचे धारिष्ट्य दाखवणारेच नेते कमी उरलेत. त्यात अजित पवार हे अग्रणी होते हे नक्की. मनसेतर्फे अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.