केडीएमसीत राजू पाटील खरे ‘धुरंधर’
शिंदे गट-मनसेच्या ‘गनिमी काव्या’ने भाजप सत्तेबाहेर!
डोंबिवली, ता. २८ : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सत्तास्थापनेत एक मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. वर्षानुवर्षांचे वैर आणि राजकीय कटुता बाजूला सारत मनसेचे नेते राजू पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी हातमिळवणी केली आहे. मनसेच्या पाच नगरसेवकांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने शिंदे गटाची सरशी झाली असून, भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात त्यांना यश आले आहे.
निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि शिवसेना शिंदे गट युती म्हणून उतरले होते. प्रचारातही एकजुटीचे चित्र दिसले; मात्र प्रत्यक्ष सत्तेचा सोपान चढताना राजकारणाचे गणित पूर्णपणे बदलले. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिंदे गटाने मनसेला जवळ करण्याची खेळी खेळली. या संपूर्ण घडामोडीत राजू पाटील किंगमेकर ठरले असून, त्यांच्या निर्णायक भूमिकेमुळे पालिकेतील भाजपची पकड सैल झाली आहे.
संजय दत्तच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या डोंबिवलीतील चित्रीकरणाची आठवण ताजी असतानाच मनसे कार्यकर्त्यांनी याच शब्दाचा वापर करून शहरात मोठी बॅनरबाजी केली आहे. राजू पाटील यांना ‘कल्याण-डोंबिवली पालिकेतील सत्तेचा रिअल धुरंधर’ असे संबोधत त्यांचे फलक ठिकठिकाणी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अंबरनाथचा वचपा
अंबरनाथमध्ये नगराध्यक्षपद गमावल्याने शिंदे गटाला बसलेला धक्का भरून काढण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत भाजपचे वजन कमी करण्याची रणनीती आखण्यात आली होती. मनसेच्या मदतीने ही रणनीती यशस्वी करीत शिंदे गटाने भाजपला दुय्यम स्थानावर ढकलले आहे. या नव्या समीकरणामुळे भाजपच्या स्थानिक गोटात मोठी अस्वस्थता पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.