रायगडचा रणसंग्राम तापला
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी ५०२ उमेदवार मैदानात
अलिबाग, ता. २८ (वार्ताहर) ः नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवसानंतर आता जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी व पंचायत समित्यांच्या ११८ गणांसाठी एकूण ५०२ उमेदवार रिंगणात आहेत.
निवडणुकीसाठी १६ ते २१ जानेवारीदरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. मुदतीत जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी ३६८ तर पंचायत समितीच्या ११८ गणांसाठी ६७८ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या अर्जाची छाननी गुरुवारी (ता. २२) झाली. छाननीत जिल्हा परिषदेचे सात तर पंचायत समितीचे २२ अर्ज अपात्र ठरविण्यात आले होते, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत मंगळवारी जिल्हा परिषदेच्या १९२ तर पंचायत समितीच्या ३२७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७३ तर पंचायत समितीच्या ११८ जागांसाठी ३२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाकरे गट, शरद पवार गट, काँग्रेस, भाजप, अजित पवार गट, शिंदे गटासह अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
१७ लाख मतदार बजावणार हक्क
रायगड जिल्ह्यात १७ लाख ३८१ मतदार आहेत. यामध्ये आठ लाख ५७ हजार नऊ महिला आणि आठ लाख ४६ हजार ३४७ पुरुष तसेच २५ तृतीयपंथी मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या मोठी असून, त्यांच्या हाती उमेदवारांचे भवितव्य असल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील दोन हजार ३२३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. रायगड जिल्हा परिषद व जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.
महायुतीत ‘बिघाडी’
जिल्ह्यात महायुतीतील तिन्ही घटकपक्ष म्हणजेच भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्यातील जागावाटपाबाबतची बोलणी फिस्कटल्याने जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढणार आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून शेकाप, काॅंग्रेस व ठाकरे गट एकत्र तर काही ठिकाणी स्वतंत्र लढत आहेत. यामुळे सर्वच ठिकाणी अटीतटीची निवडणूक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.