राजकीय छत्र हरपले
ठाण्यात अजित पवार गट झाला पोरका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची वार्ता धडकताच ठाणे जिल्ह्यातही शोककळा पसरली आहे. त्यांना मानणारा एक गट ठाणे शहरासह जिल्ह्यात सक्रिय आहे. यामध्ये प्रमोद हिंदुराव, नजीब मुल्ला, आनंद परांजपे आणि कॅप्टन आशीष दामले ही नावे प्रामुख्याने घेतली जातील. राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर या तिघांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला यश मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. अजित पवार यांच्या निधनामुळे त्यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांवर दुखाचा डोंगर कोसळला असून, राजकीय छत्र हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथे भाजपही आपला गड मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण या दोघांच्या वादामध्ये राष्ट्रवादीने आपली जिल्ह्यात ताकद सिद्ध केली होती. गणेश नाईक यांच्या रूपाने जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पालकमंत्री होता. जिल्हा परिषदेपासून ते जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचा झेंडा होता. दिवंगत वसंत डावखरे विधानपरिषदेचे उपसभापती असल्याने त्यांनाही मानणारा गट होता. या दोन प्रभावशाली नेत्यांमध्ये आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीही आपली ओळख निर्माण केली. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी तीन गटांमध्ये विभागली गेली तरी राष्ट्रवादीची राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा शब्द हा शेवटचा मानला जायचा. साधारण २०१४ नंतर अजित पवार यांनी ठाण्यात विशेष लक्ष देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा नवीन गट तयार झाला.
प्रमोद हिंदुराव हे अजित पवार यांचे अत्यंत खास, जवळचे मानले जातात. त्यामुळे राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली. नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी केवळ साथ दिली नाही तर ठाण्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टीकटीक कायम ऐकू यावी यासाठी प्रयत्न केले. ठाण्यात राष्ट्रवादीचे भव्य कार्यालय सुरू केले. त्या वेळी अजित पवार स्वत: उद्घाटनाला आले होते. नजीब मुल्ला आणि परांजपे यांना महत्त्वाची पदे दिली. विधानसभा निवडणुकीत मुल्ला यांना मुंब्य्रासाठी तब्बल ५० कोटींचा विशेष निधी दिला. मुल्ला यांना पराभव स्वीकारावा लागला तरी आता महापालिका निवडणुकीत त्यांनी आठ नगरसेवक निवडून आणले. ही ताकद अजित पवारांमुळे त्यांना मिळाली. बदलापूरमध्ये कॅप्टन आशीष दामले यांना राज्यमंत्र्याचा दर्जा असलेले ब्राह्मण मंडळ दिले. या जोरावर दामले यांनी बदलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उपनगराध्यक्ष पद मिळवले.
शिलेदारांवर विश्वास
एकंदरीत जिल्ह्यात शिवसेना, भाजप हे दोन पक्ष आपली ताकद वाढवत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपले अस्तित्व अधोरेखित केले. कोणताही हस्तक्षेप न करता अजित पवारांनी आपल्या शिलेदारांवर दाखवलेला तो विश्वास होता. त्यामुळे या शिलेदारांचे राजकारणही केवळ अजित पवार या एका व्यक्तिमत्त्वाभोवती फिरत राहिले. राज्यात सत्ता आणि हातात तिजोरीची चावी असल्याने मोठ्या निधीसाठी ते आश्वस्त होते. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यामुळे त्यांची पुढची राजकीय वाटचाल कोणत्या दिशेला जाते हे पहावे लागणार आहे.
अजित पवारांचे ठाण्यावर लक्ष
अजित पवार यांचे ठाण्यावर विशेष लक्ष होते. आमदार जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचा किल्ला लढवत असल्याने त्यांनी नजीब मुल्ला यांना विशेष बळ दिले होते. येथील राजकारणावर त्यांची नजर होती. म्हणूनच संधी मिळेल तेव्हा ठाण्यात अचानक येऊन ते पदाधिकारी आणि कार्यकत्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करण्याचे काम करायचे. विधानसभा निवडणुकीपूर्वी एकदा सकाळीच सात वाजता पक्ष कार्यालय गाठून त्यांनी सर्वांची झोप उडवली होती.