संविधान अधिकार देते, तर भाषा ओळख देते
कल्याणमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात
कल्याण (वार्ताहर) : ‘भारताचे संविधान आपल्याला नागरिक म्हणून अधिकार प्रदान करते, तर आपली मातृभाषा आपल्याला खरी ओळख देते. मराठी ही इतिहासाची आणि संस्कृतीची समृद्ध भाषा आहे. ही समृद्धी टिकवण्यासाठी मराठीचे संवर्धन आणि ती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन कोकण ग्रंथालय संघाचे अध्यक्ष दिलीप कोरे यांनी केले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक वाचनालय, कल्याण येथे ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’निमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘विद्यार्थी चालवितात वाचनालय’, ‘पुस्तक रसग्रहण स्पर्धा २०२६’ आणि ‘माझे कल्याण शहर - प्रश्नमंजूषा’ अशा नावीन्यपूर्ण स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये कल्याणचे बिर्ला व अचिव्हर्स महाविद्यालय, डोंबिवलीचे प्रगती महाविद्यालय आणि उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे कल्याणमधील सांस्कृतिक वर्तुळात कौतुक होत आहे. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
भाषेशी समरस व्हा
वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना मातृभाषेशी समरस होऊन ती वापरातून जिवंत ठेवण्याचे आवाहन केले. रोटरी क्लब ऑफ कल्याणच्या अध्यक्षा रुईता सपकाळ यांनी वाचनालयाच्या उपक्रमाचे कौतुक करीत २१ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. या वेळी उपाध्यक्षा आशा जोशी, चिटणीस नीलिमा नरेगलकर, अमिता कुकडे, अरुण देशपांडे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रंथसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.