चौक नामकरणानंतर देखभाल दुर्लक्षित
नेरूळ, ता. २९ (बातमीदार) : नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सीबीडी बेलापूर सेक्टर २ येथील प्रमुख चौकास ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. मात्र, नामकरणानंतर अपेक्षित असलेले सौंदर्यीकरण व नियमित देखभाल न झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी दिसून येत आहे.
या चौकात पाच घोड्यांच्या आकर्षक प्रतिकृती उभारण्यात आल्या असून, त्या चौकाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आहेत. तथापि, चौकातील विद्युत रोषणाई व कारंजे मागील सुमारे सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने चौकाचे सौंदर्य मावळले आहे. रात्रीच्या वेळी चौकात अंधार पसरत असून, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर, निवडून आलेल्या सन्माननीय नगरसेवकांनी तातडीने लक्ष घालून नवी मुंबई महानगरपालिकेकडून पाठपुरावा करावा, कारंजे सुरू करावेत, रोषणाई दुरुस्त करावी आणि नियमित देखभाल व्यवस्था लागू करावी, अशी जोरदार मागणी सीबीडी बेलापूरमधील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
चौकट :
कारंज्यांमुळे चौकाचा देखावा विद्रूप
बंद रोषणाई व निष्क्रिय कारंज्यांमुळे चौकाचा देखावा विद्रूप झाला असून, नवी मुंबईच्या ‘नियोजित शहर’ या प्रतिमेलाही धक्का बसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चौकाची देखभाल व सन्मान राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे अपघातांची शक्यता वाढत असल्याची भीतीही स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.