नवी मुंबई, ता. २ (वार्ताहर) : शहरात सध्या सायबर गुन्हेगारांनी आपला मोर्चा एपीके फाईल्सद्वारे फसवणूक करण्याकडे वळवला आहे. गॅस देयक, वीज बिल किंवा बँकेचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने नागरिकांना एपीके फाईल पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगून त्याद्वारे फोन हॅक करून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये नेरूळ, वाशी आणि तुर्भे परिसरात अशाच प्रकारच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये एका निवृत्त अधिकाऱ्यासह तिघांची मिळून सुमारे ४३ लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे.
नेरूळमध्ये गॅस देयकाच्या नावाखाली लूट
नेरूळ सेक्टर २० मध्ये राहणारे मारुती बावधने (वय ४६) यांना एका व्यक्तीने महानगर गॅसचा प्रतिनिधी असल्याचे भासवून संपर्क साधला. तसेच गॅस बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने त्यांना एपीके फाईल पाठवून ती डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानुसार बावधने यांनी एपीके फाईल डाऊलोड करून त्यात आपली बँकेची माहिती भरताच त्यांचा फोन हॅक झाला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून एक लाख ४५ हजार रुपये लंपास करण्यात आले. याबाबत नेरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
निवृत्त बीएआरसी अधिकाऱ्याची फसवणूक
वाशी परिसरातील एका ६० वर्षीय निवृत्त बीएआरसी अधिकाऱ्याला पंजाब नॅशनल बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवून सायबर चोरट्यांनी गाठले. त्यांना पीएनबी-वन.एपीके ही फाईल डाऊनलोड करण्यास भाग पाडले. या फाईलच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्यावर नियंत्रण मिळवून त्यांच्या खात्यातून तब्बल १३ लाख ७५ हजार रुपये चोरले. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
व्यवस्थापकाला २७ लाखांचा फटका
सर्वात मोठी फसवणूक तुर्भे पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाली आहे. एका कंपनीच्या फायनान्स मॅनेजरला एमआयडीसीचा लोगो वापरून व्हॉट्सॲपवर पाण्याचे बिल अपडेट.एपीके फाईल पाठवण्यात आली. त्यानंतर सायबर चोरट्याने एमआयडीसी पाणीपुरवठा विभागातून बोलत असल्याचे भासवून त्यांना एपीके फाईलची लिंक ओपन करण्यास सांगितले. व्यवस्थापकाने लिंकवर क्लिक करताच कंपनीच्या बँकेच्या दोन खात्यांमधून एकूण २७ लाख ७० हजार रुपये वेगवेगळ्या खात्यात वळवून चोरण्यात आले.
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
वाढत्या सायबर गुह्यांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच सायबर टोळीची कार्यपद्धती लक्षात घेता व्हॉट्सॲप किंवा एसएमएसद्वारे आलेल्या कोणत्याही अनोळखी एपीके फाईल्स कधीही डाऊनलोड करू नका. या फाईल्समध्ये मालवेअर असू शकतो, जो तुमचा फोन हॅक करतो. कोणत्याही बँकेचे किंवा सरकारी ॲप डाऊनलोड करायचे असल्यास फक्त गुगल फ्ले स्टोअर किंवा ॲपल ॲप स्टोअरचाच वापर करा. कोणतीही बँक किंवा सरकारी विभाग फोनवर ग्राहकांची वैयक्तिक माहिती, ओटीपी किंवा बँक कार्ड डिटेल्स मागत नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
फोन हॅक झाल्याचे कसे ओळखावे?
जर तुमची माहिती भरल्यानंतर फोन अचानक संथ झाला, स्क्रीन आपोआप काम करू लागली किंवा अनोळखी मेसेज येऊ लागले, तर तुमचा फोन हॅक झालेला असू शकतो. अशा वेळी त्वरित इंटरनेट बंद करा. सायबर फसवणूक झाल्यास विलंब न करता १९३० या हेल्पलाइन किंवा नवी मुंबई पोलिस हेल्पलाईन ८८२८११२११२ या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.