मेट्रो मार्गातील अडथळा दूर
कापूरबावडीतील इमारत भुईसपाट; ठाणे-कल्याण मेट्रो ५च्या कामाला वेग
ठाणे शहर, ता. ३१ (बातमीदार) : ठाणे, भिवंडी, कल्याण मेट्रो मार्गिकेतील ठाण्यातील अडथळा अखेर दूर झाला आहे. घोडबंदर मार्गावरील कापूरबावडी नाक्याजवळ मेट्रोच्या मार्गाच्या आड येणाऱ्या धोकादायक इमारतीच्या पाडकामाला सुरुवात झाल्याने अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला ठाण्यातील भिवंडीकडे जाणारा मेट्रो मार्ग पूर्ण होणार आहे. या ठिकाणी मेट्रोचा पिलर उभा करण्यात येणार असल्याने दोन्ही बाजूने अर्धवट मेट्रो मार्गिका आता जोडली जाणार आहे.
ठाण्यातील कापूरबावडी येथून सुरू होणारा मेट्रो-५ (ऑरेंज लाइन) मार्ग भिवंडीमार्गे कल्याणला जाणार आहे. सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या या मार्गावर १७ स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे प्रवासाचा वेळ ५०-७५ टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होणार आहे. त्याच्या वाटेतील ठाण्यातील अंतिम अडथळा शुक्रवापासून दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले. कापूरबावडी नाका येथील धोकादायक इमारत पाडली जात नसल्यामुळे या ठिकाणी मेट्रो मार्गिकेचे एक पिलर उभे करणे शक्य होत नव्हते. परिणामी गेल्या दोन-तीन वर्षांपासून भिवंडीकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम रखडले होते. मात्र आता ही इमारत पाडण्याचे काम हाती घेण्यात आले असून, लवकरच ती पूर्णतः भुसपाट केली जाणार आहे. त्यानंतर इमारतीच्या जागेवर मेट्रोचा पिलर उभा करून मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे. कापूरबावडी येथे मेट्रो स्थानक तयार केले जात आहे. तत्पूर्वी हा मार्ग कशेळी खाडीपुलावरून भिवंडीकडे गेला आहे. मात्र पुढे जाणाऱ्या या मार्गावरील कापूरबावडी येथील एका पिलरमुळे तो अर्धवट सोडून देण्यात आला होता; मात्र आता ते विघ्न दूर झाले आहे.
प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन
इमारतीचे पाडकाम करीत असताना संबंधित यंत्रणेकडून प्रदूषण नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याची घटनादेखील या वेळी घडली. धोकादायक असलेली ही इमारत पाडत असताना कापूरवाडी नाका परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले होते. याबाबत ठाणे महामालिका प्रदूषण नियंत्रण विभागाचे कनिष्ठ अभियंता आकाश जगताप यांचे संपर्क साधला असता ही मातीचे पाडकाम करीत असलेल्या संबंधित यंत्रणेला निर्देश देऊन घटनेच्या ठिकाणी पाण्याचे फवारे मारण्याचे आदेश दिल्याचे जगताप यांनी सांगितले. मेट्रो मार्गिकेला अडथळा ठरत असलेली धोकादायक इमारत एका मोठ्या राजकीय नेत्याची असल्याने ती पाडण्यासाठी विलंब होत होता असे समजते; मात्र आता हा अडथळा दूर झाला आहे.
मार्गिकेवरील स्थानके :
कापूरबावडी, बाळाकूम नाका, कशेळी, काल्हेर, पूर्णा, अंजूरफाटा, धामणकर नाका, गोपाळनगर, टेमघर, राजनौली, गोवेगाव, सहजानंद चौक, दुर्गाडी किल्ला, कल्याण.
लांबी : २४.९ किमी
स्थानके १७
प्रवास वेळ : सध्याच्या तुलनेत खूप कमी, थेट कनेक्टिव्हिटी
टप्पे : सर्व काम प्रगतिपथावर असून, पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी लवकरच कार्यान्वित होणार आहे.
कनेक्टिव्हिटी : कापूरबावडे येथे मेट्रो लाइन ४ (वडाळा-ठाणे-कासारवडवली) मार्गाशी जोडणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.