सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : काही वर्षांपासून शिक्षणक्षेत्रात होत असलेले बदल, विद्यार्थ्यांवरील डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव, शिक्षकांवरील प्रशासकीय कामाचा ताण; तसेच मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व या विषयांवर ‘सकाळ एनआयई’ आणि गणपत युनिव्हार्सिटी व पडो इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात शुक्रवारी मुख्याध्यापकांसाठी परिसंवाद घेण्यात आला. मुख्याध्यापक मिट २०२६ या उपक्रमांतर्गत परिसंवादात शिक्षण तज्ज्ञांकडून सखोल चर्चा करण्यात आली. या उपक्रमाला ‘पढो इंडिया’चे संचालक सुधीर चहांदे
व गणपती युनिव्हर्सिटीचे प्रादेशिक प्रमुख अनुप मुलताईकर यांची विशेष उपस्थिती होती.
‘सकाळ’ माध्यम अनेक वर्षांपासून केवळ वृत्तांकनापुरता मर्यादित न राहता सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे. शाळा, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व मार्गदर्शन उपक्रम राबवत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या वेळी आरती बनसोडे यांनी या उपक्रमांतर्गत घेतलेल्या परिसंवादात मुख्याध्यापिका डॉ. सुरेखा पाटील, भारती रुळे, सुनीता अनभुले आणि शिल्पा अष्टमकर हे सहभागी झाले होते. डिजिटल तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर अपरिहार्य असला तरी त्याबरोबरच अनुभवाधारित, कृतीतून आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणपद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले. मोबाईल आणि स्क्रीन टाइममुळे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रतेचा अभाव निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना सकारात्मक पद्धतीने गुंतवून ठेवणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमे, प्रकल्पाधारित शिक्षण, कार्यमॉडेल्स, तसेच ‘पीअर लर्निंग’ म्हणजे विद्यार्थी-विद्यार्थ्यांमधून शिक्षण या पद्धती प्रभावी ठरत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. केवळ पाठ्यपुस्तकातील मजकूर न शिकवता त्यामागील आशय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी मांडले. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट होतात, आत्मविश्वास वाढतो आणि बौद्धिक विकास सुदृढ होतो. इंग्रजीचे महत्त्व मान्य असले, तरी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून झाल्यास पुढे इंग्रजी आत्मसात करणे अधिक सोपे होते, असेही सांगण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आठवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांचा पाया अधिक भक्कम होतो, असे मत शिल्पा अष्टमकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या शैक्षणिक उपक्रमांचे उपस्थितांनी कौतुक केले.
वाचनसंस्कृती रुजवणे आवश्यक
वर्तमानपत्रे व वाचनसंस्कृती कमी होत चालल्याबद्दलही चिंता व्यक्त करण्यात आली. विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालक व शिक्षकांनी स्वतः वाचनाची सवय लावून उदाहरण घालून देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. प्राथमिक स्तरापासून कथा, वैज्ञानिक व प्रेरणादायी साहित्याच्या माध्यमातून वाचनाची गोडी लावल्यास ही संस्कृती रुजवता येईल, असेही सांगण्यात आले.
........
वैदिक गणिताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील गणिताची भीती कमी करण्याचा प्रयत्न ‘पढो इंडिया’च्या माध्यमातून केला जात आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या पद्धतीचा अवलंब केल्यास विद्यार्थ्यांना अधिक फायदा होईल. ‘सकाळ एनआयई’च्या माध्यमातून विद्यार्थी व मुख्याध्यापकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, त्याबद्दल विशेष आनंद वाटला.
- शालिन भगत, आंतरराष्ट्रीय वैदिक गणित प्रशिक्षक
उपक्रमाच्या माध्यमातून पुणे शहरातील सहभागी मुख्याध्यापकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मूल्याधिष्ठीत शिक्षण पद्धतीचा व सर्वांना समान शिक्षण देण्याचा उपयोग नक्की होईल. गोव्यात गणपत युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून उच्चशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
- मौरवी वसावडा, कार्यकारी अधिष्ठाता, गणपत युनिव्हर्सिटी
स्वातंत्र्योत्तर भारतातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे तिसरे महत्त्वाचे आहे. त्याची यशस्वी अंमलबजावणी शिक्षक प्रशिक्षण आणि शालेय पातळीवरील कृतीवर अवलंबून आहे. याअंतर्गत पूर्वप्राथमिक शिक्षणाचा समावेश, कौशल्याधारित शिक्षण, मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व, लवचिक भाषा धोरण, मूल्यांकन पद्धतीत बदल यांसारख्या बाबींवर भर देण्यात आला आहे. भारतात प्रथमच पूर्वप्राथमिक शिक्षण औपचारिक शिक्षणप्रणालीशी जोडले आहे. राज्य सरकारने २०२३मध्ये अभ्यासक्रमाचा आराखडा जाहीर करून २०३० पर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामध्ये कौशल्याधारित अभ्यासक्रम, समावेशक शिक्षण, डिजिटल शिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात आला आहे.
- डॉ. माधवराव सूर्यवंशी, शिक्षण अभ्यासक, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.