दिबांच्या नावाबाबत केंद्र सरकार सकारात्मक
नवी मुंबई विमानतळ; लोकसभेच्या अधिवेशनात अधिकृत माहिती सादर
पनवेल, ता. ३१ (बातमीदार) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दी. बा. पाटील यांचे नाव देण्यास केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे उघड झाले. दिल्ली येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली. त्यामुळे नामकरणाबाबत पनवेल, उरण, नवी मुंबई आणि रायगडमधील भूमिपुत्रांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला यश आले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झाला असल्याची नागरी विमान वाहतूक मंत्रालयातर्फे लोकसभेत माहिती सादर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेला ठराव केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला अधिकृतपणे प्राप्त झाला असल्याची खात्री संबंधित विभागाने दिली. याप्रसंगी या विभागाने स्पष्ट केले आहे की, राज्याने पाठवलेल्या ‘लोकनेते दि. बा. पाटील’ या नावाच्या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक असून, त्यावर प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे. विमानतळाचे अधिकृत नामकरण ही एक निश्चित प्रशासकीय प्रक्रिया आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकार आता यावर अंतिम तांत्रिक मोहर उमटवण्याच्या तयारीत आहे.
मंत्रिमंडळाची २०२२ मध्ये नावाच्या प्रस्तावाला मंजुरी
नवी मुंबईच्या शेतकऱ्यांना, त्यांच्या जमिनीला योग्य मोबदला मिळावा, यासाठी दि. बा. पाटील यांनी मोठा लढा दिला होता. या जमिनी महाराष्ट्राच्या सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून नियोजित नव्या शहराच्या उभारणीसाठी संपादित करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्र मंत्रिमंडळाने २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस यांच्या भाजप-शिवसेना सरकारने या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.
-----
लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव या विमानतळाला मिळावे, हा केवळ आमचा आग्रह नसून तो प्रत्येक भूमिपुत्राचा हक्क आहे. केंद्र सरकारने संसदेत दिलेली ही माहिती आपल्या लढ्याला मिळालेली महत्त्वाची पावती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थानिक जनतेच्या भावनांची कदर करत असून, लवकरच यावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल, असा आम्हाला विश्वास आहे.
- प्रशांत ठाकूर, आमदार, पनवेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.