अंधेरी पश्चिम-कूपर रुग्णालय प्रवेश मार्गावर कारवाई
सुमारे २०० अनधिकृत फेरीवाले व वाढीव बांधकामे निष्कासित
घाटकोपर, ता. ३० (बातमीदार) :
अंधेरी पश्चिम येथील महापालिकेच्या डॉ. रू. न. कूपर रुग्णालयाच्या प्रवेश मार्गावर अनधिकृत फेरीवाले तसेच पदपथांवरील वाढीव बांधकामांमुळे आपत्कालीन प्रसंगी रुग्णवाहिकांच्या मार्गक्रमणास अडथळे निर्माण होत होते. यामुळे पादचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागाकडून मंगळवारी (ता. २९) मोठ्या प्रमाणावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सुमारे २०० अनधिकृत फेरीवाले तसेच पदपथावरील वाढीव बांधकामे हटविण्यात आली. कूपर रुग्णालयाच्या प्रवेश मार्गाशी संलग्न असलेल्या स्वामी विवेकानंद मार्ग, गुलमोहर मार्ग आणि राम गणेश गडकरी मार्ग (इर्ला मार्ग) या प्रमुख मार्गांचा या कारवाईत समावेश होता. सदर कारवाई बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार, उपायुक्त (परिमंडळ ४) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (के पश्चिम) चक्रपाणी अल्ले यांनी राबवली. यामध्ये सुमारे १०० अधिकारी व कर्मचारी, अतिक्रमण निर्मूलनाची चार वाहने, तीन जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.
कारवाईदरम्यान परिसर पूर्णतः मोकळा करण्यात आला असून, या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या कारवाईबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. अनधिकृत फेरीवाले व वाढीव बांधकामांवर पुढील काळातही कारवाई सुरू राहील, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.