नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे;
फेब्रुवारीअखेरीस २४ तास कार्यान्वित होणार?
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) मुंबई महानगर क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरत असून, येत्या काळात येथून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरू होण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून विमानतळ २४ तास कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे देशांतर्गत उड्डाण सेवांचा विस्तार होणार आहे.
सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून देशांतर्गत व्यावसायिक उड्डाणे सुरू असून, इंडिगो, एअर इंडिया एक्स्प्रेस, अकासा एअर इत्यादी विमान कंपन्यांच्या नियमित सेवा उपलब्ध आहेत. प्रारंभी ठरावीक वेळेत चालणारा हा विमानतळ आता २४×७ कार्यरत होणार असल्याने रात्रीच्या वेळेतील उड्डाणे व आगमनासही सुरुवात होणार आहे. यामुळे प्रवाशांची कमी गैरसोय होणार असून, विमान कंपन्यांनाही वेळापत्रक आखण्यास मोठी मदत होणार आहे.
विमानतळ प्रशासन आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून आवश्यक तांत्रिक व सुरक्षाविषयक प्रक्रिया पूर्ण होत आहे. मार्च-एप्रिल २०२६ दरम्यान आंतरराष्ट्रीय उड्डाणांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. सध्या कार्गो हाताळणी यंत्रणा सज्ज झाली आहे. मात्र आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी महत्त्वाचे असणाऱ्या आंतरराष्ट्रीय टर्मिनल, इमिग्रेशन, कस्टम्स यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होण्याची प्रतीक्षा अखेरच्या टप्प्यात आहे. विमानतळ सुरू झाल्यापासून साधारणपणे सहा महिन्यांच्या कालावधीत म्हणजेच २०२६च्या मध्यापर्यंत आंतरराष्ट्रीय सेवांना हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. जरी धावपट्टी आणि एअरसाइड पायाभूत सुविधा मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानांना हाताळण्यासाठी सक्षम असल्या तरी टर्मिनलच्या आत कस्टम्स आणि इमिग्रेशन सुविधांची पूर्णपणे चाचणी होणे आवश्यक आहे.
एअर इंडिया ग्रुपने नवी मुंबई विमानतळाबाबत अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. त्यांच्या एअर इंडिया एक्स्प्रेस या उपकंपनीने सुरुवातीला १५ शहरांसाठी दररोज २० उड्डाणे सुरू केली असून, २०२६च्या मध्यापर्यंत ही संख्या दररोज ५५ उड्डाणांपर्यंत नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. महत्त्वाचे म्हणजे यामध्ये दररोज पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश असेल. अकासा एअर ही दुसरी प्रमुख विमान कंपनी आहे, जी नवी मुंबईतून मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय उड्डाणे घेण्यास उत्सुक आहे. त्यांनी दर आठवड्याला ५० आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचे दीर्घकालीन लक्ष्य ठेवले आहे. प्रामुख्याने आखाती देश आणि आग्नेय आशियातील बाजारपेठांवर या विमान कंपन्यांचे लक्ष असेल.
पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी सुमारे नऊ कोटी प्रवासी आणि मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक हाताळण्यास सक्षम असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ताण कमी करणे, नवी मुंबईसह रायगड जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देणे आणि रोजगार निर्मिती वाढवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू झाल्यानंतर नवी मुंबई विमानतळ देशातील महत्त्वाच्या विमान वाहतूक केंद्रांपैकी एक म्हणून उदयास येणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.