मद्यधुंद पर्यटकांची स्थानिकांना डोकेदुखी
श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांच्या वाहनांचे अपघात ठरताहेत चिंतेचा विषय
श्रीवर्धन, ता. २ (वार्ताहर) ः कोकणातील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी श्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, गेल्या दोन वर्षांत वाढलेले भीषण अपघात आता चिंतेचा विषय बनत आहेत. या अपघातांच्या मालिकेमागे मद्यधुंद चालक हे प्रमुख कारण असल्याचे प्रकर्षाने समोर येत आहे. मद्यप्राशन करून बेदरकारपणे वाहने चालवणाऱ्या पर्यटकांमुळे जीव धोक्यात आल्याची स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
तालुक्यात अलीकडेच घडलेल्या तीन गंभीर अपघातांनी संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या तिन्ही घटनांमधील साम्य म्हणजे अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या वाहन तपासणीकरिता काही दिवस महत्त्वाचा ठिकाणी पोलिस ठाण्याकडून चेकपोस्ट उभारण्यात आले होते. या वेळी संशयास्पद पर्यटकांच्या वाहनांची तपासणी केली करण्यात येत होती, परंतु तालुक्यातील मुंबई-पुण्यातील धनदांडग्यांनी सुरू केलेले रिसॉर्ट्स हे केअर टेकरकडे सोपविण्यात आले आहेत. हे केअर टेकर पर्यटकांना सर्रास मद्य पुरवत असल्याची माहिती समोर येत आहे.
केअर टेकरत पुरवतात मद्य
तालुक्यातील स्थानिक व्यावसायिक प्रशासनाचे नियम पाळून व्यवसाय करत असले, तरी मुंबई-पुण्यातील धनदांडग्यांनी सुरू केलेले रिसॉर्ट केअर टेकरकडे सोपवले जातात. हेच केअर टेकर सर्रास पर्यटकांना मद्य पुरवतात. श्रीवर्धन येथील थार अपघात प्रकरणातील अल्पवयीन तरुण हे आलेल्या रेस्टॉरंटवर दोन दिवस मद्यपान करून गोंधळ घालत होते. स्थानिकांनी ही घटना केअर टेकरच्या कानावर घातली होती, परंतु त्यांनी दुर्लक्ष केले, असे श्रीवर्धन येथील एका पर्यटन व्यवसायिकाने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.
अपघातांची मालिका
१ हरिहरेश्वर येथे खोली भाड्याच्या वादातून एका मद्यधुंद पर्यटकाने होम स्टे मालकाच्या बहिणीला गाडीखाली चिरडले.
२ श्रीवर्धन येथील एका अल्पवयीन थारचालकाने दुचाकीस्वाराला चिरडल्याची घटना घडली.
३ दिवेआगरमध्ये एका चारचाकीने दुचाकीला धडक देऊन चालकाला फरपटत नेले, यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
४ या तिन्ही घटनांमधील साम्य म्हणजे अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
सुट्ट्यांच्या दिवशी चेकपोस्ट उभारत संशयित पर्यटकांचे ब्रेथलायझर केले जाईल. तसेच गाड्यांची तपासणी केली जाईल. तपासणीदरम्यान वाहनात मद्याचा साठा आढळल्यास कारवाई करण्यात येईल. जेणेकरून दुर्घटना टळतील, अशा उपाययोजना आखण्यात येतील.
- सुरेंद्र गरड, पोलिस निरीक्षक, श्रीवर्धन पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.