सकाळ माध्यम प्रायोजक
खारेगावच्या भूमीत रंगले कुणबी महासंमेलन
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थी गुणगौरव, सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदियाळी
कळवा, ता. २ (बातमीदार) ः ठाणे शहरापासून एका हाकेच्या अंतरावर शांत व निवांत ठिकाणी सायंकाळच्या बोचऱ्या हवेत उजळणाऱ्या विजेच्या दिव्यांच्या खुल्या मंचावर कुणबी महासंमेलन जल्लोषात व उत्साहात पार पडले. खारेगाव येथील गणेश विद्यालयाच्या प्रांगणात रविवारी (ता. १) हा सोहळा झाला. या कार्यक्रमाचे ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किसन कथोरे, शिवसेना उपनेते व जिजाऊ संघटनेचे संस्थापक नीलेश सांबरे, ठाणे महापालिका भाजप गटनेते मुकेश मोकाशी, नवनिर्वाचित नगरसेवक नारायण पवार, एकता भोईर, यज्ञा भोईर, काजल गुनिजन, नेहा काठोले, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी के. डी. ठाकरे, उद्योजक गजानन जाधव, सेवासंघाचे अध्यक्ष पी. एन. पाटील, संस्थापक किरण घरत, उपाध्यक्षा गीतांजली पाटील, सचिव किशोर पाटील, खजिनदार सी. बी. शेलार, माजी अध्यक्ष सुदाम पाटील, बी. डी. पाटील, मोहन पाटील, गुरुनाथ पाटील, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत पठारे, शहापूर कुणबी महोत्सवाचे अध्यक्ष किरण सोकांडे, मधुकर फर्डे, शेखर पाटील, ॲड. राजाराम तारमळे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सेवासंघाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच दहावी व बारावी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, सेवानिवृत कर्मचाऱ्यांचा व विशेष नैपुण्यधारकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी सेवासंघाचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी सेवासंघाच्या वाटचालीची माहिती उपस्थितांना दिली. जिजाऊ संघटनेचे संस्थापक नीलेश सांबरे यांनी कुणबी बांधवांना मार्गदर्शन करताना कुणबी एकवटला पाहिजे. शहरात कुणबीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी समाजाने एकसंघ राहण्याचे आवाहन केले. ठाणे शहरात कुणबी भवन उभे करण्यासाठी २५ लाखांची देणगी जाहीर केली. तर आमदार किसन कथोरे यांनी सध्या कुणबी शेतकऱ्याचा सातबारा कमी होऊ लागला असून, तो अल्पभूधारक झाला आहे. भविष्यात तो भूमीहीन होईल, अशी खंत व्यक्त करून कुणबी ताकद पुढे गेली पाहिजे. कुणबी समाजातील मुले आयपीएस व मोठ्या हुद्द्यावराचे अधिकारी झाले पाहिजेत, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी कुणबी समाज एकत्र राहिला पाहिजे. यासाठी येत्या वर्षभरात ठाणे शहरात कुणबी भवन उभे करण्याचे आश्वासन समाज बांधवांना दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणबी बोली भाषेत राजेश पाटील यांनी केले. त्यांना सुधाकर जाधव व मीना पाटील यांनी साथ दिली. तर आभार एस. एस. पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहसंमेलन समिती प्रमुख किसन बोंद्रे, केशव पवार, प्रतिभा पाटील आणि विठ्ठल निमसे यांनी विशेष मेहनत घेतली.
तारपा नृत्याचे विशेष आकर्षण
कुणबी महिलांनी रंगमंचावर सादर केलेल्या बहारदार आदिवासी तारपा नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. दर्शना सासे यांनी सादर केलेला दातांचे दातवण हे लोकनृत्य, आरोही राऊत हिने ललाटी भंडार, मनीषा पष्टे यांनी ‘सावर सावर अंबाबाई’, रुपाली माळी व तिच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले ‘नाच गं घुमा’ गाण्यांनी उपस्थितांचे मनोरंजन केले. कार्यक्रमात छोट्या कैवल्य पष्टेने आपल्या तबला जुगलबंदीतून तर तीन वर्षांच्या ओवी पाटील या लहानगीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेच्या जयजयकाराने कार्यक्रमाची रंगत वाढवली. बऱ्याच दिवसांनी एकत्र भेटलेल्या आपल्या कुणबी बांधवांच्या नातेवाइकांबरोबर हास्यांच्या लहरीत रमलेल्या भेटीगाठी, विविध खाद्य व विविध घरगुती वस्तूंच्या स्टॉलवर झालेली खरेदीची झुंबड सर्वांचेच लक्ष वेधत होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.