बेकायदा पार्किंग करणाऱ्यांनो सावधान
अग्निशमन गाड्यांना अडथळा झाल्यास दाखल होणार गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मुंबईतील अरुंद गल्ल्या आणि रस्त्यांकडेला होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना आगीच्या घटनास्थळी पोहोचण्यास उशीर होण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. यामुळे आता बेकायदा पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर थेट गुन्हा दाखल होणार आहे. बचावकार्यात अडथळा निर्माण करणाऱ्या अशा वाहनचालकांवर आता थेट प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदवण्याचा आदेश सोमवारी (ता. २) महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी प्रशासनाला दिल आहे.
आगीच्या किंवा कोणत्याही आपत्तीच्या वेळी जेव्हा अग्निशमन दलाची वाहने शीघ्र प्रतिसादासाठी (क्विक रिस्पॉन्स) निघतात, अशा वेळी रस्त्यांवरील बेवारस किंवा वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे त्यांना मोठा अडथळा निर्माण होतो. यामुळे होणारा विलंब जीवित आणि वित्तहानी वाढण्यास कारणीभूत ठरतो. आतापर्यंत अनेक आगीच्या घटनांमध्ये अशा चुकीचे पार्किंग केलेल्या वाहनांमुळे अग्निशमन दलाचे बंब पोहोचण्यास विलंब झाल्याचे समोर आले आहे. परिणामी प्रत्यक्षात आगीवर नियंत्रण मिळवण्यात अधिक वेळ लागतो. मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्येदेखील रहिवाशांनी केलेल्या चुकीच्या पार्किंगमुळे अग्निशमन बंब पोहोचण्यात अडथळे झाल्याचे समोर आले आहे. मात्र महापालिका आयुक्तांच्या नव्या निर्देशानुसार आपत्तीच्या वेळी ज्या वाहनांमुळे अग्निशमन दलाच्या गाडीला अडथळा येईल, त्या वाहनाचा नोंदणी क्रमांक आणि छायाचित्र घटनास्थळावरील कर्मचारी नोंद करतील. त्यानंतर बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर वरिष्ठांच्या परवानगीने संबंधित पोलिस ठाण्यात त्या वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. यामुळे केवळ दंड आकारून न थांबता थेट फौजदारी कारवाईची टांगती तलवार वाहनधारकांवर असेल.
नागरिकांच्या तक्रारींचे काय?
मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांनी सांगितले, की जर एखाद्या नागरिकाने अनधिकृत पार्किंगबाबत तक्रार केली, तर ती तक्रार संबंधित पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस आणि पालिका अधिकाऱ्याकडे वर्ग केली जाईल. नागरिकांना सतर्क करण्यासाठी आणि बचावकार्यात सुसूत्रता आणण्यासाठी ही प्रणाली राबवली जात आहे.
महापालिकेचा हा नियम स्वागतार्ह आहे, पण आयुक्तांनी केवळ पार्किंगच नव्हे तर व्हीआयपी गाड्यांचा अडथळा, अनधिकृत बांधकामे आणि नियमांना बगल देऊन उभ्या राहिलेल्या उत्तुंग इमारतींचाही गांभीर्याने विचार करावा.
- एम. व्ही. देशमुख, माजी संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा
अग्नी सुरक्षेसाठी हे चांगले पाऊल आहे, पण ही कारवाई कोणत्याही दबावाशिवाय आणि सातत्याने होईल का, हा खरा प्रश्न आहे. टॉवरच्या परवानग्यांबाबतही कडक नियमावलीची आवश्यकता आहे. ते धाडसदेखील पालिका आयुक्तांनी करायला हवे.
- किरण कदम, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी, मुंबई
निर्णायामागील उद्देश
- अग्निशमन दलाचा ‘रिस्पॉन्स टाइम’ कमी करणे
- वेळेवर पोहोचून जीवित तसेच वित्तहानी टाळणे
- थेट गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने बेकायदा पार्किंगवर निर्बंध
- अनधिकृत पार्किंगमुळे त्रस्त नागरिकांना अग्निशमन दलाकडे दाद मागता येईल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.