पीएमश्री उपक्रमातून मुलींना तायक्वांडोचे धडे
उल्हासनगर, ता. २ (वार्ताहर) : महापालिकेच्या पीएमश्री शाळा क्रमांक २५ मध्ये विद्यार्थिनींना स्वयंरक्षण प्रशिक्षणाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गेल्या सहा महिन्यांपासून मुलींना तायक्वांडोचे धडे देण्यात येत आहेत. निर्भय, आत्मविश्वासी आणि सक्षम घडवण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
हा उपक्रम आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबवण्यात येत आहे. उल्हासनगर महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी दीपक धनगर यांच्या सहकार्याने त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका गार्गी चतुर्वेदी यांच्या पुढाकारातून या उपक्रमाला दिशा मिळाली आहे.
विद्यार्थिनींना तंत्रशुद्ध व शास्त्रीय प्रशिक्षण मिळावे यासाठी राज्यस्तरीय खेळाडू व तायक्वांडो प्रशिक्षक गोल्डी पांडे यांची आमंत्रित शिक्षक म्हणून मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली आहे. आठवड्यातून तीन दिवस, शालेय वेळेव्यतिरिक्त या विद्यार्थिनींना स्वयंरक्षणाचे विविध तंत्र शिकवले जात आहेत.
या प्रशिक्षणामध्ये केवळ शारीरिक बचाव तंत्रच नव्हे, तर संकटसमयी प्रसंगावधान, आत्मविश्वास, मानसिक बळकटी आणि धैर्य कसे राखावे याचेही मार्गदर्शन केले जाते. आपल्या मुलींना शालेय स्तरावरच असे संरक्षणाचे धडे मिळत असल्याने पालकांनी महापालिका प्रशासन व शाळेच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले आहे. मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी शिक्षणासोबत संरक्षणाचे बळ देणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही आदर्श ठरत असून, सक्षम व आत्मविश्वासू पिढी घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
आजच्या काळात मुलींना केवळ शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करणे पुरेसे नाही, तर त्यांना स्वतःचे संरक्षण करण्याची ताकद देणेही तितकेच आवश्यक आहे. पीएम श्री उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या स्वयंरक्षण प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, धैर्य आणि प्रसंगावधान वाढत आहे. यामुळे मुली अधिक निर्भयपणे वावरू लागल्या असून पालकांचाही विश्वास दृढ झाला आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना आम्ही सातत्य देणार आहोत.
- गार्गी चतुर्वेदी, मुख्याध्यापिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.