कर्करोगाविरुद्ध पालिकेचे मिशन शक्ती
सहा हजार महिलांची होणार मोफत तपासणी; टाटा मेमोरियल रुग्णालयासोबत करार
कल्याण, ता. ४ (बातमीदार) : जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून कल्याण डोंबिवली महापालिकेने या गंभीर आजाराविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयासोबत झालेल्या करारामुळे शहरातील सहा हजार संशयित महिलांची सखोल तपासणी आणि उपचार विनामूल्य केले जाणार आहेत.
कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांचा शोध घेण्यासाठी महापालिकेच्या आशा स्वयंसेविकांनी चार लाखांहून अधिक महिलांचे सर्वेक्षण केले आहे. त्यातून प्राथमिक लक्षणे आढळलेल्या सहा हजार महिलांची ओळख पटवण्यात आली आहे. टाटा मेमोरियलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून या महिलांची पॅप स्मियर आणि बायोप्सी यासारख्या महत्त्वाच्या चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. कर्करोगाचे वेळेवर निदान झाले तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. ‘मिशन शक्ती’च्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून जनजागृती करीत आहोत, अशी प्रतिक्रिया या वेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी दिली आहे.
लक्षणे आढळल्यास तपासणी करा
शरीरावर कोणत्याही प्रकारची न दुखणारी गाठ येणे.
आवाजात अचानक बदल होणे किंवा घसा बसणे.
विनाकारण वजन वेगाने कमी होणे.
दीर्घकाळ टिकणारा खोकला किंवा न भरणारी जुनी जखम.
कर्करोग रोखण्यासाठी ‘आरोग्य मंत्र’
१. व्यसनमुक्ती : तंबाखू, सिगारेट आणि मद्यपानापासून पूर्णपणे दूर राहा.
२. आहार : आहारात ताजी फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करा.
३. व्यायाम : दररोज किमान ३० मिनिटे शारीरिक व्यायाम करा.
४. नियमित स्क्रीनिंग : ४० वर्षांवरील महिलांनी दरवर्षी कर्करोग तपासणी करून घ्यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.