वसंत जाधव : सकाळ वृत्तसेवा
पनवेल, ता. ४ : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काही दिवस शिल्लक राहिल्याने ग्रामीण राजकारणात नव्या हालचालींना वेग आला असून सरपंचांना चांगलाच भाव आला आहे. येत्या काळात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असल्याने गावागावात राजकीय वातावरण तापू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सरपंच मंडळी पुन्हा एकदा झपाट्याने कामाला लागली असून, निवडणुकीच्या तयारीला सुरवात झाली आहे.
रायगड जिल्हा परिषदचे पनवेल तालुक्यात आठ गट व १६ गण आहेत. या प्रत्येक गटातील ग्रामपंचायतींचे सरपंच आपले राजकीय वजन वाढवण्यासाठी सक्रिय झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांचा विचार करता ‘आजचे काम उद्याच्या मतांसाठी’ या भूमिकेतून सरपंच जिल्हा परिषदेतील उमेदवारांच्या प्रचाराचा धडाका लावत आहेत. रस्ते, नळ पाणीपुरवठा, गटारी, सभामंडप, दिवाबत्ती, स्वच्छता यांसारख्या कामांवर सरपंच बोलू लागले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या आपल्या समर्थक उमेदवारांचा प्रचार सरपंच जोरात करताना दिसत आहेत. ‘आज मदत केली, उद्या काम पडणारच आहे’ या भावनेतून सरपंच स्वतः गावकऱ्यांच्या भेटीगाठी, बैठका घेत आहेत, प्रचारात पुढाकार घेत आहेत. काही ठिकाणी तर सरपंचच प्रचाराचे सूत्रधार बनल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात चर्चांना ऊत
ग्रामीण भागातील चावडी, चौक, चहाच्या टपऱ्या, ढाबे, ग्रामपंचायत कार्यालये पुन्हा एकदा चर्चेचे केंद्र बनली आहेत. कोण कुणाच्या बाजूने आहे, कोण पुढील निवडणूक लढवणार, कोणाला पाठिंबा मिळणार, यावर गावोगावी तर्कवितर्क रंगू लागले आहेत. यामध्ये तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच घटक उत्सुकतेने सहभागी होताना दिसत आहेत.
ग्रामीण राजकारण अधिक रंगतदार
एकीकडे विकासकामांची लगबग सुरू असली तरी दुसरीकडे राजकीय समीकरणांची जुळवाजुळवही जोरात सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून आजपासूनच पायाभरणी सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील ग्रामीण राजकारण अधिक रंगतदार होणार, यात शंका नाही. एकूणच जिल्हा परिषद निवडणुकांनंतर ग्रामीण भागात सरपंचांचे महत्त्व वाढले असून, आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गावखेड्यांतील राजकीय वातावरण तापले आहे.
भेटीगाठींवर भर
मतदारांच्या घरोघरी भेटी-गाठींवर उमेदवार व त्यांच्या समर्थकांचा भर असून आपलाच उमेदवार कसा सरस आहे, हे पटवून देत आहेत. चौकाचौकातील हॉटेल गर्दीमुळे गजबजलेले पाहावयास मिळत आहे. कोण निवडून येणार, याचे अंदाज आपापल्यापरीने मतदार व्यक्त करत आहेत. मात्र उमेदवार भेटताच, ‘आम्ही तुमचेच’, अशी सावध प्रतिक्रिया मतदार देत असल्याचे दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.