बाजारपेठेत उघड्यावर पदार्थ्यांची विक्री
नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजनांची गरज, प्रशासनाचे लक्ष अपेक्षित
तलासरी, ता. ४ (बातमीदार) : तलासरी बाजारपेठेत उघड्यावर अन्न पदार्थ विकणाऱ्या हातगाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाजारपेठेत विकले जाणारे बहुतांश पदार्थ हे झाकून ठेवलेले नसतात. तसेच हातगाड्यांवरील अस्वच्छतादेखील स्पष्टपणे जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
बाजारपेठेत अनेक ठिकाणी जिलेबी, वडापाव, ओले व सुके खजूर, आग्य्राचा प्रसिद्ध पेठा व विविध प्रकारची मिठाई थेट हातगाडीवर उघड्यावर विकली जात आहे. या पदार्थांवर जाळी अथवा काचेचे बॉक्स किंवा झाकण नसल्याने त्यावर रस्त्याची धूळ, माती तसेच माश्या बसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे तलासरी बाजारपेठेत नेहमीच मोठ्या वाहनांची वर्दळ असते. सध्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य आहे. ही धूळ थेट उघड्यावर असलेल्या पदार्थांवर जाऊन बसते. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
उघड्यावर पदार्थ विक्री सुरू असताना कोणतीही तपासणी किंवा कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच उघड्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांवर धूळ, धूर व प्रदूषणाचा मारा होत असल्याने पोटाचे आजार, विषबाधा किंवा अन्य गंभीर आजार उद्भवण्याची शक्यताही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याकडे पालघर जिल्हा अन्न व भेसळ प्रतिबंधक प्रशासनाचे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. यासंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी प्रशासनाशी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.
-------------------
कोट.
बाजारपेठेत उघड्यावर खाद्य पदार्थ विकणाऱ्या हातगाड्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र अन्न व भेसळ प्रतिबंधक प्रशासनाकडून कोणतीही कारवाई, तपासणी किंवा चाचणी होत नाही. त्यामुळे सर्रास नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. आता प्रशासनावर आमचा विश्वास राहिलेला नाही.
- मिथुन वाडिया, ग्रामस्थ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.