दर्जेदार मनुष्यबळ बनवण्यासाठी सरकार तत्पर
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे उद्गार
मुंबई, ता. ४ : जगातील अत्यावश्यक मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता दर्जेदार कुशल मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे यासाठी सरकार तत्पर असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.
राज्यात लागू करण्यात आलेली पीएम सेतू योजना आणि मुख्यमंत्री महाफंड स्वयंरोजगार योजना हा त्याचाच प्रमुख भाग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोढा यांच्या हस्ते कुर्ला येथील डॉन बॉस्को इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे उद्घाटन झाले. या वेळी संबोधित करताना लोढा यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र कौशल्य विकास सोसायटी यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या वेळी लोढा यांनी सांगितले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील युवकांसाठी कौशल्य विकासाचा प्रेरणादायी दृष्टिकोन मांडत तरुणांना नवी दिशा दिली आहे. याच संकल्पनेतून त्यांनी देशभरातील आयटीआयच्या अत्याधुनिकीकरणासाठी ६० हजार कोटींची पीएम सेतू योजना योजना आखली आहे. महाराष्ट्रालाही त्याचा लाभ होणार असून, पहिल्या टप्प्यात २४२ कोटी रुपये खर्च करून छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूरच्या आयटीआयचे आधुनिकीकरण होणार आहे. पुढच्या काही दिवसांत स्वयंरोजगार आणि स्टार्टअप्सकरिता मुख्यमंत्री महाफंड स्वयंरोजगार योजना आकाराला आली आहे. या योजनेतून राज्यभरातील पाच लाख स्टार्टअप्स सुरू करणाऱ्या तरुणांना सामायिक ऑनलाइन चाचणीद्वारे निवड करून पाच लाखांची आर्थिक मदत मिळवून दिली जाईल. त्याच्या व्याजाचा अर्धा भारही सरकार उचलणार असल्याची माहिती लोढा यांनी या वेळी दिली.
चीनमधील शांघाय येथे या वर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहे. त्याकरिता यांत्रिकी, वीज संच मांडणी, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, औद्योगिक तंत्रज्ञान, सायबर सिक्युरिटी आणि सामाजिक सुरक्षा तंत्रज्ञान या सहा कौशल्य क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धांचे देशभरात आयोजन करण्यात येत आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागामार्फत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने मुंबईत या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेत राज्यभरातून शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून, राज्यस्तरावरील विजेते उमेदवार गांधीनगर (गुजरात) येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत सहभागासाठी पात्र ठरतील. या स्पर्धेतून विजेते उमेदवारांची नावे पुढील आंतरराष्ट्रीय नामांकनासाठी पाठविण्यात येतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.