जूचंद्रमध्ये सदिच्छा समारंभाला विद्यार्थ्यांचा उत्साह
विरार, ता. ५ (बातमीदार) : मोठे होत असताना आपण समाजाचे काही देणे लागतो, ही भावना मनात रुजवली पाहिजे. अभ्यासातून केवळ गुण मिळवू नका, तर त्यासोबत संस्कारांची शिदोरीही सोबत ठेवा, असा सल्ला स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष व रायगड विभागाच्या सल्लागार समितीचे सदस्य पुरुषोत्तम पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला.
जूचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस. पी. कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (ता. ४) इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात पार पडला. त्या वेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले, त्यानंतर स्वागत गीताने मान्यवरांचे स्वागत झाले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रायगडचे सहायक विभागीय अधिकारी व प्राचार्य विलासराव जगताप यांनी बाह्य जगतात वावरताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कमी होत चाललेल्या मराठी शाळांच्या संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. स्थानिक स्कूल कमिटी सदस्या व कॉलेजच्या माजी प्राध्यापिका सुजाता पाटील यांनी विद्यार्थ्याना सुशिक्षित होताना चरित्र्यवान बना असे सांगितले. उपमुख्याध्यापक नाडेकर यांनी परीक्षेपूर्वी घ्यावयाच्या काळजी यासंदर्भात सूचना केल्या. पर्यवेक्षिका कविता पाटील यांनी परीक्षा कालावधीत अभ्यासाबरोबरच आपले आरोग्यदेखील संभाळण्याचा सल्ला दिला.
ज्युनियर महाविद्यालयातील विभागप्रमुख नीलेश गवळी यांनी विद्यार्थ्यानी कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी, सातत्य, देशप्रेम, नावीन्याचा ध्यास ही मूल्ये आत्मसात करण्याचे महत्त्व उदाहरणांसह अधोरेखित केले. इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभेच्छापर भाषणे सादर करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना कॉलेजमधील आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी म्हणून शाळा व कॉलेजशी नाते कायम ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.