पनवेल, ता. ५ (बातमीदार) : पनवेल महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपकडून महापौर आणि उपमहापौरपदासाठी उमेदवार जाहीर करण्यात कमालीची गुप्तता पाळली जात आहे. महापालिका निवडणुकीत बंडखोरीला आळा घालण्यासाठी भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत आपले पत्ते उघड न करण्याची रणनीती स्वीकारली होती. हीच रणनीती महापौर व उपमहापौर निवडीसाठीही राबवली जात आहे. त्यामुळे पनवेलच्या भावी महापौराचे नाव अद्याप गुलदस्त्यातच आहे.
महापौर आणि उपमहापौरांची निवड मंगळवारी (ता. १०) होणार असून, या निवडीतून पनवेलला दुसरा महापौर मिळणार आहे. बहुमत भाजपकडे असले तरी उमेदवार निश्चित न केल्याने राजकीय उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणत्या चेहऱ्यावर पक्ष नेतृत्व विश्वास दाखवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पनवेल महापालिकेतील विविध राजकीय पक्षांच्या गटनेतेपदांवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. महायुतीच्या गटनेतेपदी नितीन पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या गटनेतेपदी शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व केतन राम भगत यांची निवड झाली असून, शिवसेना ठाकरे गटाच्या गटनेतेपदी लीना गरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गटनेते निश्चित झाल्याने आता महापौर व उपमहापौर निवडीकडे सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. भाजपची गुप्त रणनीती आणि शेवटच्या क्षणी होणारी घोषणा यामुळे पनवेलच्या राजकारणात चांगलीच रंगत निर्माण झाली आहे. १० तारखेला होणाऱ्या निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.