अंबरनाथमध्ये रंगणार मराठी सिनेसृष्टीचा सोहळा
चित्रपट महोत्सवाची ऐतिहासिक दशकपूर्ती
अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) ः मराठी चित्रपटसृष्टीत गुणवत्ता, पारदर्शकता आणि विश्वासार्हतेचा मानदंड ठरलेला अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव यंदा आपल्या गौरवशाली प्रवासातील दहावा टप्पा साजरा करीत आहे. अंबर भरारी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवाचा पुरस्कार सोहळा शनिवार (ता. ७) धर्मवीर आनंद दिघे सभागृह येथे पार पडणार आहे.
यंदा आदिशेष, गुलकंद, सकाळ तर होऊ द्या आणि छबी या चित्रपटांनी विविध नामांकनांत आघाडी घेतली आहे. सोहळ्यात चित्रपट निर्मितीच्या विविध विभागांतील उत्कृष्टतेचा सन्मान करत ५० हून अधिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. महोत्सवाच्या संकल्पनेपासून मुख्य आयोजनाची धुरा अंबर भरारीचे संस्थापक व अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आहे. यंदाच्या महोत्सवाचे निमंत्रक नगरसेवक व निर्माता निखिल चौधरी असून, महेंद्र पाटील हे महोत्सव प्रमुख संचालक आहेत. महेश सुभेदार, गुणवंत खेरोडिया, दत्ता घावट, गणेश राठोड, अमेय रानडे, जगदीश हाडप, अभय शिंदे आणि कविता करंबळेकर हे पुरस्कार सोहळ्याचे आयोजक आहेत. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत.
नेहमीप्रमाणे याही वर्षी मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, उत्कृष्टतेचा गौरव आणि नवोदितांना प्रोत्साहन देणारा हा दहावा महोत्सव मराठी सिनेमाच्या इतिहासातील एक अविस्मरणीय पर्व ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
विजय गोखले यांना आजीवन गौरव पुरस्कार
यंदाचा आजीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक विजय गोखले यांना जाहीर करण्यात आला आहे, तर कारकीर्द गौरव पुरस्कार प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट व छायाचित्रकार अतुल शिंदे आणि ज्येष्ठ वेशभूषा डिझायनर प्रकाश निमकर यांना दिला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.