सत्तास्थापनेनंतर ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग
स्थायी समिती, शिक्षण मंडळ, सभागृह नेतेपदासाठी जोरदार लॉबिंग
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : ठाणे महापालिकेतील महापौर व उपमहापौरपदांचा तिढा सोडवण्यास शिवसेना शिंदे गटाला यश प्राप्त झाले. आता विविध महत्त्वाच्या समित्या आणि पदांवर आपले स्थान निश्चित करण्यासाठी येथे राजकीय घडामोडींना जोरदार वेग आला आहे. स्थायी समिती, सभागृह नेतेपद, शिक्षण मंडळ, विषय समित्या, प्रभाग समित्या तसेच वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये स्थान मिळविण्यासाठी नगरसेवकांकडून पक्षनेतृत्वाकडे मोठ्या प्रमाणावर लॉबिंग सुरू असल्याचे चित्र सध्या ठाण्यात दिसून येत आहे.
ठाणे महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने ७५ जागांवर विजय मिळवला असून, भाजपला २८ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १२, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नऊ, एमआयएम पाच, शिवसेना ठाकरे गट एक आणि अपक्ष एक अशा एकूण १३१ नगरसेवकांचे सभागृह तयार झाले आहे. निवडणुकीनंतर सुरुवातीला सत्तेबाहेर राहण्याची भूमिका घेतलेल्या भाजपने अखेर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. सत्तेत सहभाग घेतल्यानंतर भाजपने स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण मंडळासह विविध समित्यांमध्ये समसमान प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी दबाव वाढवला आहे. पहिल्या वर्षाचे स्थायी समिती सभापतिपद भाजपकडे यावे, यासाठी पक्षाकडून हालचालींना वेग आला आहे. शिंदे गट स्थायी समितीवरील नियंत्रण आपल्याकडेच ठेवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदासह सदस्यत्व मिळवण्यासाठीही अनेक इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, सभागृह नेतेपदासाठी तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा विचार शिंदे गटात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दुसरीकडे, परिवहन समिती, शिक्षण मंडळ, विषय समित्या आणि प्रभाग समित्यांवर स्थान मिळवण्यासाठीही नगरसेवकांमध्ये मोठी चढाओढ सुरू आहे. नगरसेवक झाल्यानंतर किमान एखाद्या महत्त्वाच्या समितीवर संधी मिळावी, यासाठीदेखील वरिष्ठांच्या कार्यालय गाठतानाचे सध्याचे चित्र आहे.
...........................
* सभापतिपदासाठी या नावांची चर्चा
ठाणे पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर स्थायी समिती सभापती कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच शिंदे गटाकडून स्थायी समिती सभापतिपदासाठी नगरसेवक हनमंत जगदाळे, योगेश जानकर, राम रेपाळे यांच्यासह काही प्रमुख नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत.
..................
* स्वीकृत नगरसेवकांसाठीही चढाओढ
ठाणे महापालिकेत १० स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार असून, त्यात शिंदे गटाला सहा, भाजपला दोन, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. भाजपकडून शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यासह आणखी एका नावाची चर्चा सुरू आहे, तर राष्ट्रवादी (शरद पवार गट)कडून शहराध्यक्ष मनोज प्रधान यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, शिंदे गटाकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून कोणाची वर्णी लागणार, याबाबत अद्याप गोपनीयता पाळली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.