नसिरुद्दीन शाह यांच्या
कार्यक्रमाचे देशभर पडसाद
विद्यापीठाने कोणताही संबंध नसल्याचे केले स्पष्ट
मुंबई, ता. ५ : ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांना मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभाग आणि एका सहयोगी संस्थेने आयोजित केलेल्या ‘उर्दू जलसा २०२६’मधील ‘प्रीत नगर’ साहित्यिक सत्रात ऐनवेळी नाकारण्यात आल्याचे देशभरात पडसाद उमटले आहेत. विचारवंत, साहित्यिक, इतिहासतज्ज्ञांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शाह यांना कार्यक्रमाला नाकारण्यात आल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. दुसरीकडे मुंबई विद्यापीठाने या कार्यक्रमात शाह यांना नाकारण्यात विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या उर्दू विभागाचा संबंध नसल्याचा खुलासा केला आहे.
अभिनेते शाह यांनी आपल्याला मुंबई विद्यापीठातील कलिना संकुलात १ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आलेल्या ‘उर्दू जलसा २०२६’च्या ‘प्रीत नगर’ या साहित्यिक सत्राच्या कार्यक्रमाला निमंत्रण देऊन त्यानंतर आपल्याला नकार दिल्याचे समाजमाध्यमांतून जाहीर केले. त्यावर लेखही लिहिला आहे. त्यावर देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी ‘एक्स’वर शाह यांनी लिहिलेल्या भूमिकेचे समर्थन करत त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी काळा घोडा येथील कार्यक्रमात एकीकडे आनंद तेलतुंबडे यांचे भाषण मुंबई पोलिसांच्या आदेशावरून रद्द करण्यात आले. आता याच मंडळींकडून त्यांच्या शाह यांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण रद्द करायला लावणे चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. राज्यात सार्वजनिक व्यासपीठांवर कोण बोलू शकते आणि कोण नाही, हे राजकीय मंडळी आणि त्यांचे पाठीराखे ठरवणार का, असा सवाल ‘एक्स’वर केला.
--
मुंबई विद्यापीठाचा स्पष्ट खुलासा
विद्यापीठाच्या उर्दू विभागाने सुप्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्याशी त्यांच्या कार्यक्रमातील सहभागाबाबत किंवा या कार्यक्रमाच्या रद्दबातलतेबाबत कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही प्रकारे संपर्क साधलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात येते. शाह यांच्या कार्यक्रमातील सहभागासंदर्भातील सर्व संवाद आयोजक संस्था बझ्म-ए-अहबाब फाउंडेशनने केला होता. त्यामुळे शाह यांना आमंत्रित करणे किंवा हा कार्यक्रम रद्द करणे, याबाबत मुंबई विद्यापीठाच्या उर्दू विभागाचा कोणताही संबंध नसल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.