यंदाही आंबा हंगाम कसोटीचाच
डहाणूत आंबा उत्पादकांना फळधारणेची चिंता
वाणगाव, ता. ८ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात डहाणूसह, पालघर, विक्रमगड, वाडा, जव्हार आणि मोखाडा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन घेतले जाते, परंतु मागील काही दिवसांत डहाणू तालुक्यात ढगाळ वातावरण आणि त्यात धुके सातत्याने असल्याने बुरशीजन्य रोगात वाढ होताना दिसत आहे. करपा रोगाचा प्रादुर्भाव आंबा मोहोरावर जाणवत आहे. डहाणू तालुक्यात काही ठिकाणी आंबा बागेत ७० ते ८० टक्के मोहोर आला असून, काही आंबा बागांमध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे, परंतु डहाणूत करपा रोगाने डोके वर काढल्याने मोहोर टिकवणे कसरतीचे ठरत आहे. दरवर्षी निसर्गाचा वाढता लहरीपणा, तसेच लांबत असलेला पाऊस, ढगाळ वातावरण, दमटपणा, आर्द्रता त्यामुळे एकंदरीत वातावणात होणारा बदल याचा परिणाम आंबा पिकांवर होताना दिसत आहे. त्यामुळे बदललेल्या हवामानाचा अंदाज घेता यंदाही आंब्याचा हंगाम आंबा उत्पादकांसाठी कसोटीचाच असणार आहे. डहाणूतील आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून फळधारणेची चिंता व्यक्त केली जात आहे, असे डहाणूतील आंबा उत्पादक शेतकरी सुदीप म्हात्रे यांनी सांगितले आहे.
सुरुवातीला आलेल्या मोहोरातून काही अंशी फळधारणा होण्यास सुरुवात झाली आहे, परंतु मागील काही दिवसांत डहाणू तालुक्यात सातत्याने ढगाळ वातावरण आणि धुके यामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. उशिरा आलेला मोहोर काळा पडून गळण्याची दाट शक्यता आहे. वेळीच उपायोजना न झाल्यास त्याचा विपरीत परिणाम आंबा उत्पादनावर होण्याची शक्यता ही वर्तविण्यात येत आहे.
चौकट
करपा रोगाची लक्षणे
-आंब्याच्या मोहोरावरील बुरशीजन्य करपा रोगाला ढगाळ वातावरण पोषक असते.
- रोगामुळे तपकिरी, काळे डाग पडून मोहोर गळून जातो.
- लहान फळांवर काळे डाग पडून फळगळ होते.
- रोगामुळे लहान नुकतील लागलेली छोटी फळे गळून पडतात.
पीक संरक्षण तज्ज्ञांच्या उपायोजना :
रोगाच्या नियंत्रणासाठी १ टक्का बोर्डो मिश्रण किंवा १० लिटर पाण्यात १० ग्रॅम कार्बेन्डाझिम + मॅंकोझेब (संयुक्त बुरशीनाशक) किंवा २५ ग्रॅम कॉपर ऑक्सीक्लोराइडची फवारणी करावी. जिवाणूमुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे म्हणजे कोवळ्या फळांवर सकाळच्या वेळी पांढरे दुधाळ बारीक दवबिंदू दिसतात. अशा वेळी बुरशी नाशकासोबत स्ट्रेप्टोसायकलिंग २ ग्राम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
प्रतिक्रिया
डहाणू तालुक्यात मागील काही दिवसांत सततच्या ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत आभाळ आच्छादित असल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. तापमान वाढत गेल्यास तुडतड्याचा प्रादुर्भावसुद्धा वाढू शकतो. त्यामुळे यंदाचा हंगाम हा आंबा उत्पादकासाठी कसोटीचा असणार आहे.
- सुदीप म्हात्रे, आंबा उत्पादक शेतकरी, डहाणू
आंबा फळपिकात रोगाची लक्षणे ओळखून योग्य वेळी शिफारस केलेल्या बुरशीनाशकाची फवारणी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे आपण फळांचे होणारे नुकसान टाळून उत्पादनात चांगली वाढ करू शकतो.
- डॉ. उत्तम सहाणे, पीक संरक्षण तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.