किताब उत्सवात गुलजार, रेखा भारद्वाज, पंडित अमरनाथ, हरी मृदुल यांच्या चर्चेने उपस्थित मंत्रमुग्ध
मुंबई, ता. १० : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे सुरू असलेल्या राजकमल प्रकाशन समूह आयोजित किताब उत्सवाच्या पाचव्या दिवसाची सुरुवात पंडित अमरनाथ यांच्या ‘हंसा के बैन’ या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाने झाली. याप्रसंगी संजीव चिम्मलगी यांनी रेखा भारद्वाज आणि गजरा कोट्टारी यांच्याशी संवाद साधला. तर गुलजार, रेखा भारद्वाज, पंडित अमरनाथ, हरी मृदुल आदींच्या चर्चेने उपस्थित मंत्रमुग्ध झाले.
गजरा कोट्टारी यांनी आपल्या वडिलांची पंडित अमरनाथ यांची आठवण काढताना सांगितले, की ‘हंसा के बैन’ याचा अर्थ ‘आत्म्याचे बोल’ असा असून, हे प्रत्यक्षात पंडित अमरनाथ यांच्या आत्म्याचेच स्वर आहेत. रेखा भारद्वाज यांनी सांगितले, की गुरुजींना हिंदी, उर्दू आणि इतर अनेक भाषांचे सखोल ज्ञान होते. ते जेव्हा बोलायचे तेव्हा ते गात असल्यासारखे वाटायचे. त्यांनी गुरुजींच्या बंदिशी एकत्र करून आणखी एक पुस्तक प्रकाशित व्हावे, अशी इच्छाही व्यक्त केली.
संजीव चिम्मलगी यांनी पंडित अमरनाथ यांच्याशी संबंधित किस्से सांगताना त्यांच्या ‘दुखवा होए गए साथी’ या बंदिशीतील काही ओळी सादर केल्या, तर गजरा कोट्टारी यांनी ‘जब मुझसे तान खो गई’ ही कविता वाचून दाखवली. रेखा भारद्वाज यांनी ‘गीत कैसे बनता है’ या कवितेचा काही अंश आणि आपल्या गुरूंच्या बंदिशीतील काही शब्द गुणगुणले.
यानंतर गुलजार यांच्या ‘गुनगुनाइए’ या गीतसंग्रहाच्या निमित्ताने युनूस खान यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘गुनगुनाइए’ या संग्रहात गुलजार यांनी लिहिलेली ५०० गीते प्रथमच एकत्र प्रकाशित करण्यात आली आहेत. संवादादरम्यान गुलजार यांनी आपल्या अनेक गाजलेल्या गीतांच्या निर्मितीमागील रंजक किस्से सांगितले. धुनांवर गीत लिहिण्याचे सौंदर्य म्हणजे त्यातून नवनवीन छंद सापडतात आणि ते त्यांनी एक सर्जनशील सोय म्हणून पाहिले असल्याचे सांगितले.
पुढील सत्रात प्रसिद्ध शायर निदा फाजली यांच्या ‘मोरनाच’ या काव्यसंग्रहाच्या पुनर्मुद्रित आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी हरी मृदुल यांनी लेखिका मालती जोशी यांच्याशी संवाद साधला, तर अभिषेक शुक्ला यांनी संग्रहातील निवडक कविता वाचून दाखवल्या. तसेच जोशी यांनी निदा फाजली यांच्याशी झालेल्या पहिल्या भेटीचा एक रंजक किस्सा सांगितला आणि त्यांनी गझल लिहूनच आपल्या प्रेमाची कबुली दिली होती, असेही नमूद केले. याप्रसंगी मालती जोशी यांनी त्यांच्या प्रसिद्ध ओळी ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता’ गुणगुणल्या. यानंतर गंगाशरण सिंह यांच्या ‘युगसारथी धर्मवीर भारती’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
-
बद्री नारायण यांच्या पुस्तकावर चर्चा
बद्री नारायण यांच्या ‘हिंदुत्व का गणराज्य’ या पुस्तकाच्या निमित्ताने डॉ. बालाजी चिरडे यांनी लेखकाशी संवाद साधला. बद्री नारायण यांनी सांगितले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत समाजात अजूनही एक जुनी स्टीरियोटाइप प्रतिमा आहे. मात्र संघाने काळानुसार स्वतःत अनेक बदल केले आहेत. दलित आणि इतर मागासवर्गीय समाजांत संघाला वाढता पाठिंबा मिळत असून, तो त्यांच्या सातत्यपूर्ण संपर्क प्रयत्नांचा परिणाम आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. संघ समाजाच्या विविध स्तरांवर सक्रियपणे कार्यरत असून, त्याबाबतची समज विकसित करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.