‘कोस्टल सायक्लोथॉन’ मुंबईकडे रवाना
वसईच्या मोटी दमण किल्ल्यात जल्लोषात स्वागत
कासा, ता. १० (बातमीदार)ः ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षेबाबत जनजागृतीच्या उद्देशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने कोस्टल सायक्लोथॉन रॅली काढली आहे. वसईच्या मोटी दमण किल्ल्यातून ही रॅली मंगळवारी मुंबईकडे मार्गस्थ झाली.
समुद्रकिनारी वास्तव्यास असलेले नागरिक, विविध सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी, युवक, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सायक्लोथॉन रॅलीत सहभागी झाले आहेत. सागरी सुरक्षेचे महत्त्व, राष्ट्ररक्षणातील नागरिकांची भूमिका आणि देशप्रेमाची भावना समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या रॅलीमध्ये एकूण १३० केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे कर्मचारी सहभागी असून, त्यापैकी तब्बल ५० टक्के महिला सायकलस्वारांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास ही रॅली डहाणू येथील पारनाका परिसरात के. एल. पोंदा हायस्कूलसमोरील मैदानावर दाखल झाली. या वेळी पालघर जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड, पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक सतीश देशमुख, सहाय्यक जिल्हाधिकारी विशाल खत्री, डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी, उपविभागीय पोलिस अधिकारी अंकिता कणसे, डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अक्षय गुडधे, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, पोलिस निरीक्षक किरण पवार उपस्थित होते.
-------------------------------------
तारपा नृत्याने स्वागत
डहाणूतील प्रसिद्ध पारंपरिक तारपा नृत्याने जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्थानिक आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या नृत्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. युवकांमध्ये देशभक्तीची भावना रुजविणे, सागरी सुरक्षेबाबत सजगता वाढविणे आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश देणे, हा या सायक्लोथॉन रॅलीचा मुख्य उद्देश असल्याचे या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘वंदे मातरम्’ कोस्टल सायक्लोथॉन रॅलीमुळे संपूर्ण किनारपट्टी परिसरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये सागरी सुरक्षेबाबत सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचे चित्र दिसून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.