आता विकासाची खरी लढाई सुरू
जलजीवन मिशन रखडले, रस्ते, पाणीप्रश्न गंभीर; श्रीवर्धनच्या नव्या प्रतिनिधींसमोर कामगिरीची कसोटी
श्रीवर्धन, ता. १० (बातमीदार) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत श्रीवर्धन तालुक्यात मतदारांनी विकासाच्या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत नव्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. बहुतांश जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले असले तरी भाजप व शिंदे गट यांनीही लक्षणीय उपस्थिती नोंदवत तालुक्यात बहुपक्षीय राजकीय समीकरण निर्माण केले आहे. निवडणुकीचा जल्लोष ओसरताच आता विजयी प्रतिनिधींसमोर मूलभूत सुविधा उभारणी आणि रखडलेली कामे मार्गी लावण्याचे आव्हान आहे.
तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत अपूर्ण राहिलेल्या पाणीपुरवठा योजना सध्याच्या घडीला सर्वात गंभीर प्रश्न आहे. अनेक गावांमध्ये पाइपलाइन टाकूनही घरोघरी नळजोडणी पूर्ण झालेली नाही. काही ठिकाणी पाण्याचा पुरवठा अनियमित असल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होत असून ‘हर घर जल’चे स्वप्न अद्याप प्रत्यक्षात उतरलेले नाही. याशिवाय तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात खचणारे पूल व अंतर्गत मार्ग, दुर्गम वाड्यांमध्ये अपुऱ्या आरोग्य सुविधा, शाळांच्या जीर्ण इमारती, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे नागरिक त्रस्त आहेत. किनारी पट्ट्यातील दिघी, बोर्ली परिसरातील मच्छीमारांना जेट्टी, कोल्ड स्टोरेज व बाजारपेठेच्या सुविधांचा अभाव जाणवतो. पर्यटन व बंदर विकास प्रकल्पांना अपेक्षित गती न मिळाल्याने स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीही मर्यादित राहिली आहे.
दरम्यान, या निवडणुकीत महिलांचे प्रतिनिधित्व वाढल्याने महिला बचत गट, स्वयंरोजगार व सामाजिक योजनांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र पक्षीय राजकारण बाजूला ठेवून सर्व प्रतिनिधींनी समन्वयाने काम केल्यास तालुक्याचा सर्वांगीण विकास शक्य आहे. मतदारांनी दिलेला कौल हा केवळ सत्तेसाठी नसून ठोस कामगिरीसाठी असल्याची जाणीव नव्या सदस्यांना ठेवावी लागणार आहे.
निवडणूक निकाल
जिल्हा परिषद आराठी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैभवी मंगेश कोमनाक या २,९१५ मतांनी विजयी झाल्या, तर बोर्लीपंचतन गटातून वासंती मंगेश गुणाजी यांनी तब्बल ८,०३५ मतांची आघाडी घेत प्रभावी विजय मिळवला. पंचायत समिती स्तरावर आराठी गणातून भाजपच्या पूजा शिंदे व राष्ट्रवादीच्या अस्मिता प्रदर्शन चोरगे, दिघी गणातून राष्ट्रवादीचे सचिन कीर आणि शिंदे गटाचे सुकुमार तोंडलेकर यांनी विजय मिळवत आपापली ताकद दाखवून दिली.
तालुक्यातील प्रमुख प्रलंबित प्रश्न
जलजीवन मिशनच्या अपूर्ण पाणीपुरवठा योजना
रस्ते, पूल व अंतर्गत मार्गांची दुरवस्था
वीजपुरवठ्याचे वारंवार खंडित होणे
मच्छीमारांसाठी जेट्टी व बाजार सुविधा अपुरी
पर्यटन व बंदर विकास प्रकल्पांना गती नसणे
आरोग्य व शिक्षण सुविधांचा अभाव
बंद होत असलेल्या मराठी शाळांचा प्रश्न
पर्यटकांच्या समस्या
छायाचित्र : बोर्लीपंचतन येथील विसर्जन घाटावर टाकलेला कचरा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.