कर्जतमध्ये परिवर्तन आघाडीचे वर्चस्व, पण जल्लोष नाही
निकाल अजित पवारांना समर्पित, विजयाचा आनंद संयमाने
कर्जत, ता. १० (बातमीदार) ः कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल सोमवारी (ता. ९) जाहीर झाले. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्या परिवर्तन विकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. मात्र हे यश मिळूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणताही मोठा जल्लोष करण्यात आलेला नाही.
परिवर्तन आघाडीला सहापैकी सहा जिल्हा परिषद जागा आणि १२पैकी १० पंचायत समिती जागा जिंकत आघाडीने कर्जत तालुक्यात स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे तालुक्यात ‘क्लीन स्वीप’ झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे वातावरण शोकाकुल असल्याने हा विजय आम्ही दादांना समर्पित करीत आहोत, असे सुधाकर घारे यांनी सांगितले. निकालानंतर कोणतीही रॅली काढली जाणार नाही तसेच मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या भूमिकेला कार्यकर्त्यांनीही पाठिंबा देत शांततेत छोट्या स्वरूपातच विजय साजरा केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता घारे या पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांनीही कोणत्याही प्रकारचा जल्लोष किंवा शक्तिप्रदर्शन न करता संयमाची भूमिका घेतली. त्यामुळे कर्जत तालुक्यात निवडणूक निकालानंतरही एकूण वातावरण शांततामय आहे.
दरम्यान, कर्जत तालुक्यात शिवसेना शिंदे गटाला आलेले अपयश आणि भाजपमधील गटबाजीमुळे पराभव हा महायुतीतील कार्यकर्त्यांनीही स्वीकारत शांतता राखण्याची भूमिका घेतली.
पोलिस अधीक्षकांच्या आवाहनाला प्रतिसाद
अलीकडेच खोपोली नगर परिषद निवडणुकीनंतर घडलेल्या हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील विजय-पराभवाच्या मिरवणुकांवर पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
रायगड जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी विजयी व पराभूत उमेदवारांना भावनिक आवाहन करीत वादविवाद टाळण्याचे व विजय शक्य तितक्या साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला सर्वच पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.