निवडणूक निकालानंतर दोन गटांत हाणामारी, गुन्हे दाखल
रेवदंडा, ता. १० (बातमीदार) : जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर अलिबाग तालुक्यातील चौल परिसरात दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना सोमवारी (ता. ९) घडली. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून, रेवदंडा पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागाव (ता. अलिबाग) येथून शिंदे गटाचे चौल जिल्हा परिषदेचे विजयी उमेदवार सचिन राऊळ यांची भाची राजलक्ष्मी स्वामीतकर (वय ३८) ही चारचाकी वाहनाने चौल शीतलादेवी मंदिराकडे जात होत्या. ही गाडी चौल तुलाडदेवी परिसरात ठाकरे गटाच्या कार्यालयाजवळ येताच कार्यकर्त्यांनी गाडी अडवली आणि तोडफोड सुरू केली. साहिल राऊत याने रॉडने गाडीची काच फोडली, तर अन्य कार्यकर्त्यांनी गाडीतील अंकित गुरव व विघ्नेश माळी यांना मारहाण केली. तसेच महिला प्रवाशाशी अश्लील वर्तन करून ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद दिली आहे. रेवदंडा पोलिसांनी याप्रकरणी १७ आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनीही पोलिसांत तक्रार दिली आहे. म्हात्रे हे आपल्या कार्यालयात मतांची आकडेवारी तपासत बसले असताना, शिंदे गटाचे कार्यकर्ते तेथे फटाके वाजवत होते. सुरेंद्र म्हात्रे यांच्या मुलाने ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी त्यांना फटाके लावण्याबाबत हटकले. हाच राग मनात धरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बेकायदा जमाव जमवून म्हात्रे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच म्हात्रे यांच्या पत्नीशी गैरवर्तन केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी शिंदे गटाच्या आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.