डॉक्टर भरती घोटाळ्याच्या चौकशीला गती
ट्रॉमा रुग्णालयातील उपस्थितीची समितीकडून मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : जोगेश्वरी (पूर्व) येथे असलेल्या महापालिका संचालित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर येथे डॉक्टरांच्या भरतीत झालेल्या कथित अनियमितता आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीला गती मिळाली आहे. यासाठी नेमण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीने रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना भरती प्रक्रियेतील सर्व महत्त्वाची कागदपत्रे, उपस्थिती नोंदी आणि वेतनाशी संबंधित माहिती तातडीने सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी शिवसेना (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सुरू आहे.
खासदार वायकर यांच्या आरोपांनुसार ‘ऑक्टोबर २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत तत्कालीन वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यकाळात डॉक्टरांच्या भरतीवेळी नियमांचे उल्लंघन करण्यात आले. या काळात सुमारे ६० ते ७० डॉक्टरांची नियुक्ती अनिवार्य मुलाखत प्रक्रिया न करता करण्यात आली.’ एका कराराधारित लिपिकाने वैद्यकीय अधीक्षकांच्या कथित पाठबळावर ही भरती प्रक्रिया राबवली असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, नियुक्त केलेल्या अनेक डॉक्टरांनी प्रत्यक्षात रुग्णालयात कामासाठी हजेरीच लावली नसल्याते, सांगण्यात आले. बनावट स्वाक्षरीच्या उपस्थिती नोंदीद्वारे डॉक्टरांच्या नावावर वेतन काढून आर्थिक घोटाळा झाल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
..
हस्तलिखित नोंदवहीचा वापर
आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा दावा आहे की, ‘हे प्रकरण अपवादात्मक नसून काही महापालिका रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या तथाकथित ‘कागदावरील डॉक्टर भरती’ प्रकाराचा भाग आहे. या प्रकरणात बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली जाणीवपूर्वक टाळून हस्तलिखित नोंदवहीचा वापर करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या कथित घोटाळ्यामुळे केवळ सार्वजनिक निधीचा गैरवापरच झाला नसून, रुग्णांच्या सुरक्षिततेवर आणि उपचार व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चौकशीसाठी समिती
कथित घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी महापालिकेने डिसेंबर २०२५ मध्ये तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीत कूपर रुग्णालयातील संयुक्त मुख्य कार्मिक अधिकारी मृणालिनी सर्वे, कूपर रुग्णालयाच्या औषधोपचार विभागाच्या विभागप्रमुख डॉ. नीलम रेडकर आणि सायन रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. घनश्याम आहुजा यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.