नवी मुंबई, ता. १० (वार्ताहर) : नेरूळमधील एका शाळेच्या परिसरात मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून नागरिकांनी तरुणाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र, पोलिसांच्या तपासात हा तरुण मुले पळवणारा नसून तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या तरुणाला सुखरूप त्याच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नेरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रेझेंटेशन स्कूलजवळ सोमवारी (ता. ९) सायंकाळी एक तरुण संशयास्पदरीत्या वावरत असताना नागरिकांना निदर्शनास आला. त्याच्या विचित्र कृतीवरून तो मुले पळवण्यासाठी आला असावा, या संशयावरून स्थानिकांनी त्याला पकडून चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी त्वरित हालचाली करत संबंधित तरुणाची चौकशी सुरू केली. तपासादरम्यान मध्य प्रदेशातील हस्तिनापूर येथील या तरुणाचे नाव अमित साकेत (वय २५) असून, तो ५ फेब्रुवारी रोजी मुंबईत आल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी पावणे गाव येथे राहणारी अमितची बहीण उर्मिला आणि मेहुणे सुनील विश्वकर्मा यांच्याशी संपर्क साधला असता, त्याची मानसिक स्थिती गेल्या काही दिवसांपासून ठीक नसल्याचे समोर आले. तसेच तो कामाच्या शोधात हैदराबादला जाणार होता, मात्र वाटेतच त्याची प्रकृती बिघडल्याने त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, अमित हा दुपारपासून त्या परिसरात फिरत होता. तेथे जलवाहिनीचे काम सुरू असल्याने त्याने भुकेपोटी किंवा मानसिक भ्रमात कामगारांचे डबे आणि कपडे पळवण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे स्थानिकांचा गैरसमज झाला.
हा तरुण आदल्या रात्री तुर्भे येथील रिलायन्स कंपनीजवळही आढळला होता. तेथून त्याने सीबीडी बेलापूरपर्यंत रिक्षाने प्रवास केला. मात्र, अमितकडे पैसे नव्हते आणि तो पूर्णपणे बेवारस व उपाशी अवस्थेत भटकत असल्याचे रिक्षाचालकाने सांगितले.