अरविंद गायकर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न!
पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
मुरूड, ता. १० (बातमीदार)ः पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी परेश नाका ते एकदरा पुलापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा १० फेब्रुवारीला कार्यालयासमोर आत्मदहन करणार, असा इशारा दिला होता. तथापि, त्यांच्या या निवेदनाला प्रतिसाद न दिल्याने आज मंगळवारी (ता. १०) सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालय येथे कनिष्ठ अभियंता अजित सांगळे यांच्यासमोरच अंगावर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिस हवालदार मकरंद पाटील व कनिष्ठ अभियंता अजित सांगळे यांनी पेट्रोलची बाटली व आगपेटी खेचून बाहेर फेकून दिल्याने या ठिकाणी मोठा अनर्थ टळला.
परेश नाका ते एकदरा पुलापर्यंतच्या रस्त्याचे काम अडीच वर्षांपूर्वी अलिबाग येथील एका कंपनीला मिळाले होते. परंतु ठेकेदारांनी या रस्त्याकडे अक्षरक्ष: दुर्लक्ष केल्याने पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाच्या वतीने अध्यक्ष अरविंद गायकर यांनी निवेदन देऊन हा रस्ता नव्याने लवकरात लवकर तयार करण्याची विनंती व निवेदन सादर केले होते.
या प्रकरणावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदारावर अडीच वर्षांत कोणतीही कारवाई केली गेली नाही. रस्त्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी २६ जानेवारीला निवेदन देऊन आत्मदहनाचा इशारा गायकर यांनी दिला होता. परंतु २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विनंतीला मान देत त्यांनी तारीख पुढे ढकलली. दरम्यान, ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कोणतीही कारवाई होत नसल्याने आज (ता. १०) सकाळी अरविंद गायकर यांनी कनिष्ठ अभियंता अजित सांगळे यांच्याशी चर्चा केली. परंतु रस्त्यासंदर्भात ठोस निर्णय न झाल्याने अरविंद गायकर यांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या वेळी पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे उपाध्यक्ष देवेंद्र सतवीडकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
रस्त्याच्या कामाला सुरुवात केल्यावर निधी दिला जाईल, असे ठेकेदाराला सांगण्यात आले होते. आतापर्यंत कार्यालयामार्फत यासंदर्भात ११ नोटिसा देण्यात आल्या असून, ठेकेदाराकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अंतिम नोटिसीत १६ फेब्रुवारीपूर्वी रस्त्याच्या कामाला सुरुवात न केल्यास निविदा रद्द करण्याची कार्यवाही सुरू होईल. त्यानंतर पुनश्च: फेर निविदेद्वारे अन्य ठेकेदारांकडून रस्त्याचे काम पूर्ण होईल. यासंदर्भातील पत्र अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता एम. एम. धायतडक यांनी गायकर यांना दिले आहे.
- अजित सांगळे, कनिष्ठ अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.