महाशिवरात्रीसाठी प्राचीन शिवमंदिर सज्ज
१५ फेब्रुवारीला अंबरनाथमध्ये यात्रोत्सव; नगराध्यक्षांकडून तयारीची पाहणी
अंबरनाथ, ता. ११ (वार्ताहर) : जागतिक कीर्तीचे आणि सुमारे एक हजार वर्षे जुने असलेल्या अंबरनाथच्या पुरातन शिवमंदिराचा कायापालट आता अंतिम टप्प्यात येत आहे. हे मंदिर जागतिक दर्जाचे धार्मिक पर्यटन क्षेत्र व्हावे, ही अंबरनाथकरांची कित्येक वर्षांची मागणी आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. महायुती सरकारने मंजूर केलेल्या १४० कोटी रुपयांच्या भरीव निधीतून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली ‘काशी कॉरिडॉर’च्या धर्तीवर मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
येत्या १५ फेब्रुवारीला होणाऱ्या महाशिवरात्री यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी बुधवारी (ता. ११) मंदिर परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी त्यांनी भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. महाशिवरात्रीला होणारी लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेऊन यंदा प्रशासनाने कंबर कसली आहे. भाविकांना शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर परिसर आणि बाहेरील भागात बॅरिकेटिंग करून रांगेचे नियोजन केले जाणार आहे. त्यानुसार काम करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी प्रशासनाला दिले आहेत. पिण्याचे पाणी, स्वच्छता मोहीम आणि ई-मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, सर्व स्ट्रीटलाईट आणि हायमास्ट दिव्यांची दुरुस्ती, रांगेतील अडथळे दूर करण्यासाठी झाडाझुडपांची छाटणी आणि पडलेली झाडे तातडीने हटवणे अशी कामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
‘काशी-वाराणसी’च्या धर्तीवर विकास
शिवमंदिर सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत संपूर्ण परिसर काळ्या पाषाणात विकसित केला जात आहे. यामध्ये वाहनतळ, भव्य प्रदर्शन केंद्र, प्रवेशद्वारासमोरील नंदी चौक, संरक्षक भिंत, चेकडॅम आणि भक्त निवासाचे काम वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य घाटामुळे भविष्यात भाविकांना काशी-वाराणसीप्रमाणे ‘घाट आरती’चा मनमोहक अनुभव घेता येणार आहे. प्राचीन कुंडांच्या पुनरुज्जीवनाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
वाहतुकीत बदल आणि सुरक्षा व्यवस्था
महाशिवरात्रीच्या मध्यरात्री जुन्या अंबरनाथ गावातील ग्रामस्थ पुजारी कुटुंबाकडून पारंपरिक अभिषेक आणि आरती संपन्न होईल. त्यानंतर पहाटेपासून मंदिर भाविकांसाठी दर्शनाला खुले केले जाईल. गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी वाहतुकीत पुढीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. उल्हासनगर कैलास कॉलनी ते शिवमंदिर आणि अंबरनाथ स्टेशन रोड ते श्री स्वामी समर्थ चौकापर्यंत सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल. या यात्रोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली पोलिस विभाग, नगरपालिका कर्मचारी आणि विविध सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक तैनात राहणार आहेत. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि संयम राखून उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.