कल्याणच्या संतोषनगरमध्ये नाल्याला आग
महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव धोक्यात
कल्याण, ता. १२ (बातमीदार) ः संतोषनगर परिसरातील मुख्य नाल्यात बुधवारी (ता. ११) दुपारी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. नाल्यात साचलेल्या प्लॅस्टिक आणि सुक्या कचऱ्याच्या प्रचंड साठ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले होते. सुदैवाने, स्थानिक नागरिकांची सतर्कता आणि अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली असली, तरी या घटनेने महापालिकेच्या नालेसफाईच्या दाव्यांमधील फोलपणा उघड केला आहे.
बुधवारी दुपारी संतोषनगरमधील मुख्य नाल्यातून अचानक धुराचे लोट येऊ लागले. नाल्यात मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिकच्या पिशव्या, सुका कचरा आणि टाकाऊ वस्तू साचल्या होत्या, ज्यामुळे आगीने पाहता पाहता उग्र रूप धारण केले. नाल्याच्या अगदी जवळ रहिवासी वस्ती, दुकाने आणि वाहतुकीचा पूल असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. आगीची तीव्रता पाहून रहिवाशांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत स्थानिकांनी पाण्याचा मारा करून आग पसरण्यापासून रोखली. त्यानंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.
दुर्घटनेची भीती
नाल्याला आग कशीकाय लागू शकते, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. या घटनेमुळे काही गंभीर मुद्दे समोर आले आहेत. नाल्यात कचऱ्याचे ढीग साचले आहेत, याचा अर्थ कित्येक दिवसांपासून तिथे सफाई झालेली नाही. नाल्याचा वापर कचराकुंडीसारखा होत असूनही प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच सुक्या कचऱ्यामुळे आगीच्या घटना वाढण्याची शक्यता असल्याने रहिवासी चिंतेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.