पीओपी गणेशमूर्तींच्या व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर
शास्त्रोक्त, पर्यावरणपूरक कार्यवाहीसाठी महापौरांकडे लेखी मागणी
नेरूळ, ता. १२ (बातमीदार) : गणेशोत्सव २०२५, माघी गणेशोत्सव २०२६ नंतर नवी मुंबईत संकलित करण्यात आलेल्या पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) गणेशमूर्तींच्या शास्त्रोक्त व पर्यावरणपूरक व्यवस्थापनासाठी तातडीने ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नीलेश सोमाजी कचरे यांनी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
नवी मुंबई महापालिका नियोजनबद्ध शहर म्हणून ओळखली जात असली तरी विसर्जनानंतर संकलित करण्यात आलेल्या पीओपी मूर्तींच्या व्यवस्थापनाबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. गणेशोत्सव २०२५ दरम्यान नवी मुंबईत १४३ कृत्रिम आणि २२ नैसर्गिक तलावांमध्ये सुमारे १० हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. तसेच माघी गणेशोत्सव २०२६मध्ये ८३८ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. विसर्जनानंतर या मूर्ती विविध ठिकाणी साठवून ठेवण्यात आल्या आहेत.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पीओपी मूर्तींचे ठरावीक कालावधीत वैज्ञानिक व पर्यावरणपूरक व्यवस्थापन करणे अपेक्षित असताना सहा महिने उलटूनही कोणतीही ठोस व नियोजनबद्ध कार्यवाही झाली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याची भावना निर्माण होत आहे.
चौकट
साठवणुकीमुळे प्रशासनावर आर्थिक व व्यवस्थापकीय ताण
पीओपी गणेशमूर्ती ज्या ठिकाणी साठवून ठेवण्यात आल्या आहेत, ती ठिकाणे महापालिका व सिडकोच्या महत्त्वाच्या कार्यालयांजवळ तसेच वाहतुकीच्या दृष्टीने संवेदनशील भागात आहेत. त्यामुळे दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत असून देखरेख, सुरक्षा व साठवणुकीवर होणारा खर्च महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मूर्तींची ठिकाणनिहाय अचूक संख्या व सद्य:स्थितीचा तातडीने सर्वेक्षण अहवाल जाहीर करावा. पर्यावरणतज्ज्ञ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व संबंधित विभागांच्या सल्ल्याने पीओपी मूर्तींचे वैज्ञानिक विघटन, पुनर्प्रक्रिया अथवा पर्यावरणस्नेही पद्धतीने व्यवस्थापन करून उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निश्चित कालमर्यादेत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी नीलेश कचरे यांनी केली आहे.
पारदर्शक माहिती अधिकृत माध्यमांतून जाहीर केल्यास गैरसमज व अफवांना आळा बसेल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.