व्हॅलेंटाईन डे जुळवणार लग्नाची नाती
‘परिचयोत्तर विवाह’ संकल्पनेतून लग्नाळू युवकांसाठी संवादशाळा
ठाणे, दि. १२ (बातमीदार) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जोडीदार विवेकी निवड विभागातर्फे युवा संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्याच्या युगात ठरवून पार पडणाऱ्या लग्नसोहळ्यापेक्षा प्रेमविवाहाला जास्त पसंती दिली जाते. फेब्रुवारी महिन्यात येणाऱ्या व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने असंख्य तरुणमंडळी कोर्ट मॅरेजही करतात. ‘परिचयोत्तर विवाह’ संकल्पनेतून व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हे अभियान आयोजित करण्यात आले असून, त्यात लग्नाळू तरुणमंडळी व त्यांच्या पालकांसाठी संवादशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या ‘युवा संकल्प अभियाना’चा समारोप शनिवार, १४ फेब्रुवारी २०२६ला व्हॅलेंटाईन डेनिमित्त डोंबिवली पश्चिम येथील स. हैं. जोंधळे पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. सध्याच्या काळात पारंपरिक कांदेपोहे पद्धतीतील अल्प परिचयावर आधारित विवाह किंवा केवळ आकर्षणातून होणारे प्रेमविवाह या दोन्ही प्रकारांमध्ये अनेक मर्यादा जाणवत असल्याचे समितीचे मत आहे.
या परिषदेला प्रसिद्ध अभिनेता, नाट्यकलाकार व निर्माता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री शर्मिला शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष माधव बावगे असतील, तर उद्घाटन देवेंद्र जोंधळे यांच्या हस्ते होणार आहे. परिषदेत जोडीदाराची विवेकी निवड, प्रेम व लैंगिकता, सामाजिक दबाव, कायदे आणि समावेशकता या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. अनिल उकरंडे, आरती नाईक तसेच तृतीयपंथी समुदायातील प्रतिनिधी वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. युवक-युवती आणि त्यांच्या पालकांसाठी संवादशाळेद्वारे परस्पर संमती, भावनिक-बौद्धिक अनुरूपता, मूल्यव्यवस्था, आर्थिक व मानसिक सुदृढता अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
----------------
- विवेकाधिष्ठित संकल्पना
अपुरी समज, सामाजिक दबाव, अंधश्रद्धा किंवा चुकीच्या अपेक्षा यामुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होऊन काही वेळा गंभीर परिणामही दिसून येतात. या पार्श्वभूमीवर ‘परिचयोत्तर विवाह’ ही अधिक समंजस आणि विवेकाधिष्ठित संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. समितीने प्रेम व आकर्षणातील फरक समजून घेणे, हुंडा व पत्रिकेला नकार देणे, साधेपणाने विवाह करणे आणि आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाहांना सकारात्मक दृष्टीने पाहणे ही पाच सूत्रे मांडली आहेत. विद्यार्थी, पालक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.