सलग पाचव्या दिवशीही दादर फेरीवालामुक्त
पालिका, पोलिसांची संयुक्त कारवाई; नागरिकांचा सुटकेचा नि:श्वास
प्रभादेवी, ता. १४ (बातमीदार) ः दादर परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर पालिका व पोलिसांनी संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईचा परिणाम म्हणून सलग पाचव्या दिवशीही दादर परिसर फेरीवालामुक्त दिसून आला आहे. स्थानक परिसरात वाढलेल्या फेरीवाल्यांमुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांकडून सातत्याने केली जात होती.
दादरमधील केशवसुत उड्डाणपुलाखालील भाग, रानडे रोड, एन. सी. केळकर रोड तसेच कबुतरखाना परिसरातील पदपथांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले होते. त्यामुळे नागरिकांना चालणेही मुश्किल झाले होते. कारवाईनंतर पदपथ मोकळे झाल्याने स्थानिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
पालिकेकडून सध्या फेरीवाल्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू असून, फेरीवाले बसल्यास त्यांना हटवून दंड आकारला जात आहे. ही मोहीम किती दिवस कायम राहणार, असा सवाल दादरकरांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, भाजपच्या स्थानिक पदाधिकारी अक्षता तेंडुलकर यांनी रुग्णवाहिकेतून व्हिडिओ शूटिंग करून वाहतूक कोंडीचा मुद्दा अधोरेखित केला होता. दादर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे रुग्णवाहिकेलाही मार्ग काढताना अडचणी येत असल्याचा दावा त्यांनी केला होता. फेरीवाला धोरण राबविताना स्थानिक व मराठी फेरीवाल्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी तेंडुलकर यांनी केली आहे. दुसरीकडे काही फेरीवाल्यांनी आपण अधिकृत असून, सर्व्हे पावती असतानाही बसण्यास विरोध होत असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेने किमान न्यायालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकापासून १५० मीटर अंतरापर्यंत कारवाई कायम ठेवावी, जेणेकरून नागरिकांना गर्दीतून मार्ग काढण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.