जव्हारमध्ये ‘बांबू ऑक्सिजन पार्क’ पर्यटकांचे नवे आकर्षण
निसर्गाशी थेट नातं, आदिवासी संस्कृतीचा संगम; स्थानिक महिलांना बांबू उद्योगातून रोजगार
जव्हार, ता. १५ ः मनमोहक धबधबे, समृद्ध आदिवासी राजवट आणि संस्कृती यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जव्हार तालुक्याच्या पर्यटनात आता आणखी एका आकर्षक स्थळाची भर पडली आहे. केशव सृष्टी ऑक्सिजन पार्कअंतर्गत उभारण्यात आलेले ‘बांबू ऑक्सिजन पार्क’ पर्यटकांसाठी निसर्गाशी थेट नातं जोडण्याचे शांत, हिरवे ठिकाण ठरत आहे.
जव्हार शहरापासून डहाणू मार्गावर सुमारे आठ किलोमीटर अंतरावर, बाळकापरा गावाजवळील निसर्गरम्य रामनगर परिसरात २०२१ला ५,५०० बांबूंची लागवड करण्यात आली. सुमारे १९ एकर परिसरात विस्तारलेल्या या हरित उपक्रमातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश दिला जात असून आदिवासी परंपरा, कला आणि स्थानिक महिला कारागिरांच्या कौशल्याचा अनोखा संगम येथे अनुभवता येतो. पार्कमध्ये बांबू वन, झाडांवरील रंगरंगोटी, नैसर्गिक गुंफा, बांबू हट, विश्रांती बेंचेस, नैसर्गिक झुले व मचाण अशा विविध रचना उभारण्यात आल्या आहेत. या नैसर्गिक देखाव्यांमुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी हा परिसर विरंगुळ्याचे आवडते ठिकाण बनला आहे.
-------------
चौकट
- महिलांना नवी संधी
केंद्रप्रमुख कैलास खुरकुटे यांच्या मते, बांबू ही केवळ वनस्पती नसून पर्यावरणाचे रक्षण करणारे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणारे प्रभावी साधन आहे. बांबूपासून कंदील, सजावटीच्या वस्तू, टी-कोस्टर, मोबाईल स्टँड आदी वस्तू तयार करण्यासाठी स्थानिक महिलांना १५ दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महिलांना स्थानिक बाजारपेठेत रोजगाराची नवी दारे खुली होत आहेत.
- पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश
चार वर्षांपूर्वी लावलेल्या बांबूंची संख्या वाढून सध्या ६० हजारांहून अधिक रोपे विकसित झाली असून येत्या दोन ते तीन वर्षांत ती काढणीसाठी तयार होण्याची शक्यता आहे. वृक्षारोपण, प्लॅस्टिकमुक्त परिसर आणि निसर्ग संवर्धन या उद्दिष्टांसह विविध उपक्रम येथे राबवले जात आहेत. दररोज शेकडो नागरिक या ऑक्सिजन पार्कला भेट देत असून विद्यार्थी, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक सकाळ-संध्याकाळ येथे फिरण्यासाठी येतात.
----------------
कोट
पूर्वी येथे रोजगार हमी योजनेच्या कामावर विसंबून राहावे लागत होते; मात्र आता या ठिकाणी ‘केशव सृष्टी’च्या माध्यमातून ‘ऑक्सिजन पार्क’ची निर्मिती झाल्याने गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे.
- सविता काकरा, रहिवासी, रामनगर
पर्यटक या भागात भेट द्यायला येऊ लागले आहेत, त्यामुळे बचत गटाला जेवण, खाद्यपदार्थ बनविण्यासारखी कामे मिळत आहेत. शिवाय, बांबूची विविध शोभीवंत वस्तू बनवून ती विक्री होऊ लागल्याने दोन पैसे मिळू लागले आहेत.
- प्रमिला कोकड, पालक, ऑक्सिजन पार्क
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.