अनधिकृत टँकरमाफियांवर कठोर कारवाई करा
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची मागणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी दिल्या आहेत. तसेच, शहरात अनधिकृत टँकरमाफियाच्या जाळ्यावर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश महापौरांनी दिले आहेत.
ठाणे पालिकेच्या महापौर दालनात पाणीपुरवठा विभागासोबत महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी बैठक पार पडली. या बैठकीस नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगर अभियंता विकास ढोले, कार्यकारी अभियंता उपस्थित होते. ठाणे महापालिका हद्दीत काही भागांमध्ये भासत असलेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची पहिलीच पाणीपुरवठा आढावा बैठक घेत नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला थेट हात घातला.
सध्या महापालिका हद्दीत जाणवणाऱ्या पाणीटंचाईचा सविस्तर आढावा घेत ज्या भागांत समस्या अधिक तीव्र आहे, तेथे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश देण्यात आले. शहरात दररोज किती टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो, त्याचे नियोजन, खर्च आणि पारदर्शकता याबाबतही सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितले. बृहन्मुंबई महापालिकाकडे ५० एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्याची केलेली मागणी आणि त्याऐवजी मिळालेल्या केवळ पाच एमएलडी पाण्याचा मुद्दा गांभीर्याने मांडण्यात आला. उर्वरित पाणी मिळवण्यासाठी कोणती प्रशासकीय पावले उचलावी लागतील, याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या वेळी नगर अभियंता प्रशांत सोनग्रा यांनी या विषयासंदर्भात सोमवारी (ता. १६) बृहन्मुंबई महापालिकेत ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले. आदिवासी पाड्यांमध्ये नियमित व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. याचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
आवश्यक असल्यास अतिरिक्त टँकर वा पर्यायी स्रोतांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. नवीन बांधकाम प्रकल्पांना पाणीपुरवठा होत असताना जुन्या गृहसंकुलामधून पाणीटंचाईच्या तक्रारी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी विचारणा केली. यावर घोडबंदर भागासाठी वाढीव पाणीपुरवठा उपलब्ध करून टंचाई दूर करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. दरम्यान, ठाणे शहरासाठी आवश्यक त्या ठिकाणी नवीन कूपनलिका खोदणे व जुन्या कूपनलिकांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत सूचना केल्या. याबाबतच्या निविदा मंजूर असून तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कळवा भागातून अधिक तक्रारी
कळवा, मुंब्रा व दिवा या भागात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी घेऊन ठाणे महापालिकेमार्फत वितरित करण्यात येते, या भागात मोठ्या प्रमाणात तक्रारी असून पाणी आठ ते दहा दिवसांनंतर उपलब्ध होत असल्याबाबत महापौर यांनी सांगितले. या भागासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे वाढीव पाण्याची मागणी केली असून या भागातील पंपहाउस व जलकुंभ कार्यान्वित करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.