ठाण्यातील ज्वेलर्स दुकानातून १५ लाखांच्या मंगळसूत्राची चोरी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : येथील जांभळी नाका परिसरातील नामांकित सराफा दुकानातून तब्बल १५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरीस गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जांभळी नाका येथेल विपुल जिवावत (वय ३२) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यांचा वडिलोपार्जित सोने-चांदी विक्रीचा व्यवसाय असून जांभळी नाका येथील डीसीबी बँकेजवळ शा. धनाजी पूनमचंद ज्वेलर्स या नावाने दुकान आहे. विपुल आणि त्यांचे वडील अमृतलाल हे दुकान सांभाळत असून दुकानात दोन कामगार कार्यरत होते. डिसेंबर २०२५मध्ये राजस्थान येथील कमलेश चौधरी (वय २०) याला कामावर ठेवले होते. मात्र त्याने १६ जानेवारीला काम सोडले होते. दरम्यान, ६ फेब्रुवारीला दुपारी ग्राहकाला मंगळसूत्राचे डिझाईन दाखविताना स्टोरेजमधील बॉक्स तपासला असता एकूण १४ मंगळसूत्रांपैकी एक मंगळसूत्र कमी असल्याचे आढळले. दुकानात सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून न आल्याने संशय निर्माण झाला.
त्यानंतर दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता १२ जानेवारीला कमलेश चौधरी याने दुकान उघडण्यासाठी चाव्या घेतल्यानंतर सीसीटीव्हीचा डीव्हीआर बंद केल्याचे दिसून आले. त्यामुळे दुकानातील १६ कॅमेरे काही काळ बंद झाले होते. मात्र वाय-फायवर चालणाऱ्या दोन कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये तो तिजोरी उघडताना दिसत असल्याचा दावा तक्रारीत केला आहे. त्यानंतर आरोपीने पुन्हा डीव्हीआर सुरू करून नेहमीप्रमाणे काम केल्याचेही फुटेजमध्ये आढळले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून संशयित माजी कामगाराचा शोध सुरू केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.