भक्तीच्या महासागरात न्हाली ठाणे नगरी
महाशिवरात्रीनिमित्त शिवालयांमध्ये भाविकांची अलोट गर्दी
ठाणे, ता. १५ (बातमीदार) : ‘हर हर महादेव’चा जयघोष आणि घंटानादाने अवघी ठाणे नगरी रविवारी (ता. १५) दुमदुमून गेली. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर ठाण्यातील ऐतिहासिक आणि पुरातन शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लावल्या होत्या. कोपरीचे ऐतिहासिक मंदिर, कौपिनेश्वर मंदिर आणि ढोकाळीतील नंदीबाबा मंदिर या ठिकाणी भक्तांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.
कोपरी येथील ७५ वर्षे जुन्या ऐतिहासिक महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा झाला. १९५४मध्ये स्थापन झालेल्या या मंदिरात यंदा सिंधी समुदायाचा पारंपरिक ‘दाल पक्वान’ हा महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला. या वेळी शरद पवार गट ठाणे शहराध्यक्ष मनोज प्रधान आणि महिलाध्यक्ष ऋता आव्हाड यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. केवळ सण साजरा न करता सामाजिक भान जपून अन्नदान करणे ही कौतुकास्पद बाब आहे, असे मत मनोज प्रधान यांनी व्यक्त केले. ऋता आव्हाड यांनीही येथील भक्तिमय वातावरणाचे आणि शंकर या सहकाऱ्याच्या अथक परिश्रमाचे कौतुक केले.
ठाण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कौपिनेश्वर मंदिरात सुमारे १,१०० वर्षे जुन्या आणि राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी हजेरी लावली. १० ते १२ फूट उंचीच्या या शिवलिंगावर विविध फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. भाजपा आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, माजी खासदार राजन विचारे यांनीही येथे शिवदर्शन घेतले.
दुसरीकडे नंदीबाबा मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव यंदा तीन दिवस साजरा झाला. ढोकाळी, बाळकूम, मानपाडा, मनोरमानगर आणि कोलशेत परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. नंदीबाबा मित्रमंडळातर्फे परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे वातावरणाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले. उत्सवानिमित्त भव्य पालखी मिरवणूक व महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी मंडळाने नियोजनबद्ध व्यवस्था केली होती. सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महाशिवरात्री विशेष साधना
धार्मिक विधींसोबतच ठाण्यात आध्यात्मिक प्रगतीसाठी अंतर योग फाउंडेशनतर्फे भव्य महाशिवरात्री विशेष साधना पार पडली. ब्रह्मर्षी आचार्य उपेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजारांहून अधिक साधकांनी ध्यान आणि जपाचा अनुभव घेतला. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता वाढवण्यासाठी घेतलेल्या सत्राला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
चोख नियोजन
संपूर्ण ठाणे शहरात ठिकठिकाणी पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त आणि मंदिर समित्यांचे अचूक नियोजन असल्याने महाशिवरात्रीचा हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.