वाशी, ता. १५ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेतील प्रशासकीय राजवट संपुष्टात आल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी महापालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर होणार आहे; मात्र अद्याप स्थायी समितीचे सदस्य आणि सभापतींची निवड न झाल्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प वेळेत मंजूर करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
महापालिकेचा शेवटचा अर्थसंकल्प २०२० मध्ये सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता. त्यानंतर कोरोना महामारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने सरकारने प्रशासकांची नियुक्ती केली होती. या काळात स्थायी समिती व सर्वसाधारण सभेऐवजी आयुक्तांच्या माध्यमातूनच अर्थसंकल्प सादर केला जात होता आणि तो अंतिम मानला जात होता. २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा पाच हजार ७०९ कोटींचा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारी २०२५ला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सादर केला होता. दरम्यान, यावर्षी महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या असून महापौर व उपमहापौरांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिकेच्या पहिल्याच सभेत स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता; मात्र लोकप्रतिनिधींच्या आग्रहानंतर केवळ महापौर व उपमहापौरांचीच निवड करण्यात आली. त्यामुळे आता शुक्रवारी (ता. २०) होणाऱ्या सर्वसाधारण सभेत स्थायी समिती सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर सभापतिपदासाठी निवडणूक घेतली जाईल. सभापती निवडीनंतर आयुक्तांकडून आर्थिक ताळेबंद स्थायी समितीसमोर सादर केला जाईल. त्यावर चर्चा करून समिती अर्थसंकल्पास मंजुरी देणार आहे.
महासभेत मिळणार अंतिम मंजुरी
स्थायी समितीने मंजूर केलेला अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे. तेथे सविस्तर चर्चेनंतर अंतिम अर्थसंकल्पास मंजुरी दिली जाईल; मात्र स्थायी समिती सदस्य व सभापती निवडीस विलंब झाल्यास अर्थसंकल्प सादरीकरणास उशीर होण्याची शक्यता आहे.
किती कालावधी लागणार?
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसाठी किमान आठ दिवसांची नोटीस देणे आवश्यक आहे. या सभेत स्थायी समिती सदस्यांची निवड होईल. त्यानंतर सभापतिपदासाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे. सभापती निवडीनंतर होणाऱ्या स्थायी समिती सभेत आयुक्त अंदाजपत्रक सादर करतील. अर्थसंकल्पावर किमान दोन ते तीन दिवस चर्चा होऊन समितीकडून मंजुरी दिली जाईल. त्यानंतर विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात येऊन किमान दोन दिवसांच्या चर्चेनंतर अर्थसंकल्पास अंतिम मंजुरी दिली जाईल. ही प्रक्रिया ३१ मार्चपूर्वी पूर्ण करण्यासाठी तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.