अवयवदान आणि प्रत्यारोपणात ठाणे राज्यात आदर्श
डॉ. अशोक नंदापूरकर यांचे प्रतिपादन
ठाणे शहर, ता. १४ (बातमीदार) ः अवयवदान आणि प्रत्यरोपणात ठाणे राज्यात आदर्श ठरले आहे. ठाणे परिमंडळात तीनवर्षीय बालक, ६० वर्षीय रुग्णासह चार रुग्णांना नवे यकृत, इतर अवयव मिळून त्यांना जीवनदान मिळाले आहे. या माध्यमातून अवयव दानाच्या चळवळीला ठाण्यात सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. दात्याकडून दान केलेल्या यकृतांनी चौघांना जीवनदान मिळाले आहे. आरोग्यसेवा, मुंबई मंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नंदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात नुकत्याच पार पडलेल्या चर्चा सत्रात ठाणे परिमंडळाचे कौतुक करण्यात आले.
अवयवदान गरजेचे आहे. या दानातून गरजूला जीवनदान मिळतेच सोबतच त्याच्या रूपाने दान करणाऱ्याला मृत्यूपश्चात जिवंत राहता येते. म्हणून ही चळवळ अधिक वाढली पाहिजे. यासाठी शासनाकडून जनजागृती केली जाते. अशा जागृतीसाठी आरोग्यसेवा, मुंबई मंडळाचे उपसंचालक डॉ. अशोक नंदापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली चर्चा सत्र पार पडले. त्यात आरोग्यमंत्री यांच्यासह विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन जाधव, सहाय्यक संचालक डॉ. अभिजीत फडणीस, विभागीय मुंबईचे अध्यक्ष डॉ. एस. के. माथूर आणि समन्वयक डॉ. भरत शहा आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सर्वांनी ठाणे परिमंडळाचे कौतुक केले. ठाणे परिमंडळात नवीन वर्षात आतापर्यंत एकूण चार कॅडव्हर अवयवदान यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून, त्यामध्ये हॉरिझॉन हॉस्पिटल एक, हिरानंदानी फोर्टीज हॉस्पिटल दोन आणि एम्स हॉस्पिटल एक अशा एकूण अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. ठाण्यासाठी ही अभिमानाची बाब आहे, असे सूर या चर्चासत्रात सगळ्यांनी मांडले.
अवयवदान चळवळीने ऐतिहासिक टप्पा गाठला असून, सलग कॅडव्हर दानातून यशस्वी प्रत्यारोपणांची प्रभावी मालिका पूर्ण झाली आहे. प्रशासन, ट्रान्सप्लांट केंद्रे आणि समन्वय यंत्रणा यांच्या सुसूत्र कार्यपद्धतीमुळे अवयवदान प्रक्रियेला अभूतपूर्व गती मिळाली आहे. परिणामी तीनवर्षीय बालकेसह ६० वर्षीय रुग्णाला यकृत प्रत्यारोपणाद्वारे नवजीवन लाभले असून, ठाणे परिमंडळ राज्यासाठी आदर्श ठरत आहे, असे मान्यवरांनी म्हटले.
८ फेब्रुवारी रोजी हिरानंदानी फोर्टीज हॉस्पिटलमध्ये ७० वर्षीय अवयवदात्याचे यशस्वी कॅडव्हर दान पार पडले. त्यानंतर ९ फेब्रुवारी रोजी एम्स हॉस्पिटल येथे ३६ वर्षीय अवयवदात्याचे हृदय, यकृत व कॉर्निया यशस्वीरीत्या रिट्रिव्ह करण्यात आले. प्रशासन, रुग्णालये आणि समन्वय केंद्र यांच्यातील तातडीच्या व प्रभावी समन्वयामुळे प्रत्यारोपण प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली.
अवयवदान व्यापक सामाजिक चळवळ
अवयवदान केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एक व्यापक सामाजिक चळवळ आहे. प्रत्येक नागरिकाने मेंदूमृत्यूनंतर अवयवदानाचा निर्णय सकारात्मक दृष्टीने घ्यायला हवा. एका कुटुंबाच्या धैर्यपूर्ण निर्णयामुळे अनेकांना जीवदान मिळू शकते, असे डॉ. अशोक नांदापूरकर यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.