ठाणे महापालिकेत रंगणार ‘खुर्ची’चा खेळ
स्वीकृत सदस्यांमुळे आसन व्यवस्थेचे गणित बिघडले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता २० फेब्रुवारीला मुख्यालयात पहिली विशेष सभा होणार आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय राजवटीमुळे शांत असलेले सभागृह पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या आवाजाने दणाणून निघणार आहे; मात्र या पहिल्याच सभेपूर्वी पालिका प्रशासनासमोर नगरसेवकांच्या आसन व्यवस्थेचा मोठा पेच निर्माण झाला आहे. स्वीकृत सदस्यांची संख्या वाढल्यामुळे सभागृहात ‘खुर्ची’वरून घमासान होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे महापालिकेत १३१ नगरसेवक निवडून आले आहेत. २०१७ च्या रचनेनुसार, सभागृहात १३१ निवडून आलेले आणि पाच स्वीकृत सदस्य अशा एकूण १३६ सदस्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार या वेळी स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून १० झाली आहे. यामुळे एकूण सदस्यांची संख्या १४१ वर पोहोचणार आहे. सध्या सभागृहात केवळ १३६ जागा उपलब्ध असल्याने, वाढीव पाच सदस्यांना कुठे बसवायचे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.
नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये मानाच्या जागेसाठी आतापासूनच स्पर्धा सुरू झाली आहे. सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि ज्येष्ठ नगरसेवकांना नेहमीप्रमाणे पुढची आसन व्यवस्था हवी आहे. दुसरीकडे, सत्ताधारी पक्षातील महिला नगरसेविका परंपरेनुसार महापौरांच्या उजव्या बाजूला एकत्रित बसण्यावर ठाम आहेत. सत्ताधारी पक्षाचे १०४ इतके मोठे संख्याबळ असल्याने ते सभागृहातील बहुतांश जागांवर कब्जा करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत स्वीकृत सदस्यांसाठी जागा शोधताना प्रशासनाची मोठी कसरत होणार आहे.
अडगळीच्या जागेवरून वादाची ठिणगी
प्रेक्षक गॅलरीच्या खाली पाच ते १० सदस्यांना बसता येईल इतकी जागा शिल्लक आहे. मात्र, ही जागा अडगळीची मानली जाते आणि तिथून सभागृहाचे कामकाज स्पष्टपणे दिसत नाही. सत्ताधारी पक्षाचे स्वीकृत सदस्य या जागेवर बसण्यास कदाचित नकार देतील. परिणामी, ही अडगळीची जागा विरोधी पक्षाच्या नशिबी येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विरोधी बाकांवरील संख्या कमी झाली असली तरी, आपल्या हक्काच्या जागेसाठी ते आक्रमक पवित्र घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासकीय पेच
निवडणुकीपूर्वी आसन व्यवस्थेत बदल करण्याबाबत कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने प्रशासनाने आहे तीच व्यवस्था कायम ठेवली होती. आता २० फेब्रुवारीच्या सभेपूर्वी ही वाढीव आसन व्यवस्था कशी केली जाते आणि ज्येष्ठ नगरसेवकांचे समाधान कसे केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.