माझी आईच एक गझल
ममता सिंधूंच्या भावनिक आठवणींना उजाळा
ठाणे, ता. १६ (बातमीदार) : मराठी ग्रंथ संग्रहालय आयोजित महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर काव्य कट्टा या उपक्रमाच्या ३१ व्या सत्रात कवयित्री ममता सिंधू यांनी आपल्या भावना आणि काव्यप्रवास उलगडला. प्रसिद्ध निवेदिका वृंदा दाभोलकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
गझल म्हणजे दोन ओळींतला टोकाचा विरोधाभास किंवा कमालीचे साधर्म्य. माझ्या आईची समाजसेवा ही तिच्या जगण्यातल्या उणिवेतून आली. ती सतत साधर्म्य शोधत गेली, म्हणून माझी आईच एक गझल आहे, अशा शब्दांत ममता सिंधू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गझल लेखनाची प्रेरणा आईकडूनच मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. दहावीत असताना १६ ऑक्टोबर १९८८ रोजी गडकरी रंगायतन येथे ‘वनवासी’ या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ठाण्यात आल्याची आठवण त्यांनी सांगितली. आज ‘चिंधीची गोष्ट’ या नव्या पुस्तकाचे प्रकाशनही याच शहरात होत असल्याने भावनिक झाल्याचे त्या म्हणाल्या. मला समाजकार्याचा वसा आईकडून मिळाला. आयुष्य दोन भागांत विभागले गेले आहे आई असताना आणि आई नसताना. आई असताना भीती नव्हती; तिच्या जाण्यानंतर मात्र आधाराची ढाल हरवल्यासारखे वाटले, असे त्या म्हणाल्या.
आईच्या निधनानंतरचा सहा-सात महिन्यांचा काळ अत्यंत कठीण गेल्याचे सांगताना त्यांनी पद्मश्री सिंधू सकपाळ यांच्या आठवणींना उजाळा दिला. खूप जवळची माणसे दूर गेली, अनोळखी माणसे जवळ आली, पण आईचे संस्कार आणि तत्त्वे कायम सोबत आहेत, असे त्यांनी सांगितले. प्रेमाच्या संकल्पनेवर बोलताना त्यांनी प्रेमाला कोणतीही मर्यादा किंवा व्याख्या नसल्याचे सांगितले. माझ्या लेखनाचा स्थायीभाव प्रेमच आहे, असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमात त्यांनी स्वतःच्या गझला सादर केल्या. तू रक्तावर नाही, दुधावर लिहितेस, असे आईचे कौतुकपर शब्दही त्यांनी या वेळी स्मरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.